
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीमुळे आपले घर आता केवळ विटा-सिमेंटचे बांधकाम राहिलेले नाही, तर ते एक ‘स्मार्ट’ सहकारी बनले आहे. एक निर्जीव वास्तू नाही, तर ते आपली काळजी घेणारे केंद्र बनले आहे. ऊर्जा बचतीपासून ते सुरक्षेपर्यंत आणि सोयीपासून ते मनोरंजनापर्यंत, एआय-सक्षम उपकरणांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापला आहे. भविष्यातील घर हे खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ असेल.
क ल्पना करा, एका व्यस्त दिवसानंतर तुम्ही थकून घरी परतता. तुम्ही गाडी पार्क करून घराच्या दरवाजाजवळ येताच, दरवाजा तुम्हाला ओळखून आपोआप उघडतो. घरात पाऊल ठेवताच तुमच्या आवडीचे मंद संगीत सुरू होते, खोलीतील दिवे तुमच्या मूडनुसार मंद प्रकाशात उजळतात आणि वातानुकूलित यंत्राने आधीच खोली तुमच्यासाठी आरामदायक तापमानावर आणलेली असते. स्वयंपाकघरातून कॉफीचा सुगंध दरवळत असतो आणि तुमचा व्हॉइस असिस्टंट तुम्हाला आठवण करून देतो, की रात्रीच्या जेवणासाठी ओव्हन आधीच प्री-हीट झाला आहे. हे सर्व वाचताना एखाद्या हॉलीवूडच्या विज्ञानकथेतील चित्रपटाचे दृश्य वाटेल, नाही का? पण थांबा! आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीमुळे हे सर्व आज आपल्या घरात, आपल्या दैनंदिन जीवनात सत्यात उतरले आहे.