

Smart Factories
esakal
एआयच्या तंत्रज्ञानामुळे कारखाने स्मार्ट होत आहेत. उत्पादन क्षमता वाढते. या प्रक्रियेत नवीन नोकऱ्या निर्माण होतील, पण त्या तितक्या प्रमाणात निर्माण होतील की नाही, याविषयी शंका आहे. दहा-वीस वर्षांत बेकारीची कुऱ्हाड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतत बदलत राहणं आणि नवीन शिकत जाणं हाच उद्याच्या जगात यशाचा मंत्र असणार आहे.
एका तऱ्हेनं स्मार्ट कारखाने म्हणजे स्मार्ट स्वयंपाकघरासारखेच असतात. स्मार्ट स्वयंपाकघरांना केव्हा, काय, किती आणि कसं बनवायचं, त्यासाठी लागणारे पदार्थ आणि भाज्या अगोदरच आपल्याकडे आहेत की नाहीत, ते तपासून घ्यायचं असतं. ज्या गोष्टी नसतील त्या ऑर्डर करून मागवल्या जातात. त्या आल्यानंतर योग्य कृतीनुसार आपल्याला पाहिजेत ते पदार्थ बनवून योग्य ठिकाणी ठेवणं आणि या सगळ्यांमध्ये काहीही गडबड झाली तरी स्वतःच त्यात सुधारणा करून ती गडबड निस्तारणं, हे सगळं जसं कळतं तसंच स्मार्ट कारखान्यांचं असतं.