

AI Reality Series Conclusion
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
मागील सुमारे दीड वर्षात ‘एआयचे वास्तव’ या लेखमालिकेद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बहुआयामी वास्तवाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण केला. या लेखमालिकेतून एआयची संधी, आव्हाने, नैतिकता, जोखीम आणि भविष्यातील प्रभाव यांचा सखोल आढावा घेण्यात आला. आज या मालिकेचा शेवटचा लेख लिहिताना, आतापर्यंतच्या चर्चेचा आढावा घेण्याबरोबरच पुढील वाटचालीच्या दिशेने काही संदेश द्यावासा वाटतो. एआयने शिक्षण, आरोग्य, कृषी, ऊर्जा, उद्योग, मनोरंजन, अंतराळ, पर्यावरण, बालविकास, पत्रकारिता, जनसंपर्क अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत क्रांती घडवली आहे. भाषांतर, सारांश, डेटा विश्लेषण आणि कंटेंट जनरेशन यांसारख्या कामांत एआय वेग आणि अचूकता वाढवते. उदाहरणार्थ, एकाच वेळी अनेक भाषांत भाषांतर किंवा सोशल मीडिया विश्लेषण यातून कामे अधिक प्रभावी होतात. तथापि, आपल्या या लेखमालिकेत आपण वारंवार यावर लक्ष केंद्रित केले, की एआय हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकते, सारांश देऊ शकते, विश्लेषण करू शकते; पण तथ्यांची पडताळणी आणि मानवी निर्णयक्षमता अपरिहार्य आहे. त्यामुळेच एआय-जनरेटेड कंटेंट वापरताना त्याची तथ्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले गेले.