ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
सन २०२२च्या अखेरीस ओपनएआयने चॅटजीपीटी सादर केल्याची घोषणा केली आणि तेव्हापासून सर्वसामान्य लोकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे नेमके काय आहे, हे समजायला लागले किंबहुना अनुभवायलाही मिळाले. त्यानंतर सर्वच ठिकाणी ‘एआय’चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.
अगदी दोन महिन्यात चॅटजीपीटीच्या वापरकर्त्यांची संख्या १० कोटींपर्यंत गेली. बघताबघता तंत्रविश्वात अनेक ‘एआय टूल्स’ आलीत आणि विविध कामांसाठी त्यांचा वापर होऊ लागला. शिक्षण, आरोग्य, नोकरी, वाहतूक, उद्योग, व्यापार, साहित्य, प्रसारमाध्यमे आदींमध्ये ‘एआय’चा वापर सुरू झाला. अनेक क्लिष्ट आणि वेळखाऊ कामे ‘एआय’मुळे झटपट होऊ लागल्याने कामाची उत्पादकता वाढली. शिवाय वेळ, खर्च तसेच मेहनतही वाचत असल्याने सर्वच क्षेत्रात ‘एआय’चे स्वागत करण्यात आले.