

AI and Scientific Discoveries
esakal
मोहितकुमार डागा
क्लॉडसारख्या एआय मॉडेल्सच्या मदतीने विज्ञानातील दीर्घकाळ अनुत्तरित कोड्यांची उकल झाल्याचे दावे केले जात आहेत. यातील महत्त्वाचा दावा म्हणजे रीमान हायपोथेसिस (गृहीतक) सिद्ध झाल्याची घोषणा. १८५९ मध्ये मांडलेले हे गृहीतक गणितातील अनुत्तरित समस्यांपैकी एक होते. याशिवाय नेव्हियर-स्टोक्स प्रश्नाचेही एआयच्या मदतीने निराकरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
एआयच्या मदतीने सोडवण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रश्नांबाबत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रथम, एआयसारख्या प्रणालींचा संशोधनासाठी उपयोग काही नवीन नाही. मागील काही दशकांमध्ये संगणक, सिम्युलेटर, अगदी एआयच्या पूर्वीच्या रूपांचाही उपयोग संशोधनाचे साधन म्हणून होत आला आहे. त्यामध्ये मानवी शास्त्रज्ञांचे योगदान प्रयोगांच्या रचनेत आणि विश्लेषणात केंद्रस्थानी असायचे. हल्लीच्या एआय-आधारित शोधांमध्ये प्रणालीची भूमिका महत्त्वाची झाली आहे, हा सर्वांत मोठा फरक आहे. या शोधांचा आधार असलेल्या तार्किक सिद्धता इतक्या विस्तृत आणि गुंतागुंतीच्या आहेत, की त्यांची पूर्णपणे मानवी पडताळणी करण्यासाठी अनेक महिने लागण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे, या शोधांमुळे प्रस्थापित विज्ञानात किंवा सामान्य जीवनात काही मोठा बदल होण्याची शक्यता सध्या तरी नाही. एआयने सिद्ध केलेली गृहीतके व्यावहारिकदृष्ट्या सत्य आहेत या आधारावर काम करणारे अनेक प्रयोग सध्या अस्तित्वात आहेत. मागील आठवड्यातील घटनांमुळे केवळ त्यांना औपचारिक मान्यता मिळाली आहे. तिसरे म्हणजे, ‘एआय’द्वारे अलीकडचे मोठे वैज्ञानिक शोध बहुतांशी काही निवडक वैज्ञानिक शाखांमध्ये केंद्रित आहेत, जसे की गणित, संगणकीय शास्त्र, जीवशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र. यामुळे एआयचा वैज्ञानिक संशोधनासाठी उपयोग काही विशिष्ट क्षेत्रांना अधिक अनुकूल दिसतो. अशा परिस्थितीत एआयमुळे विज्ञानाचे स्वरूप किती बदलेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, पारंपरिक संशोधनपद्धतींमध्ये कोणताही मूलभूत बदल होणार नाही आणि विज्ञानात तत्काळ क्रांती घडून येईल, या दोन्ही टोकांच्या मधली वाटच या परिवर्तनातून आकाराला येण्याची शक्यता अधिक आहे.