
‘एआय’च्या चर्चेमध्ये फक्त सॉफ्टवेअर क्षेत्र किंवा एकटा भारत देश आहे, असे नाही. संपूर्ण जगातच ही भीती पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी चॅट-जीपीटी आल्यानंतर जेवढा कौतुकमिश्रित उत्साह जगभर पसरला होता, तो जाऊन आता त्याची जागा भीतीयुक्त काळजीने घेतली आहे. आता अत्यंत क्लिष्ट आकडेमोडींपासून अगदी कविता आणि स्क्रिप्ट लिहिण्यापर्यंत ‘एआय’च काम करणार असल्यास आपल्यासारख्या नोकरदारांचे काय, याची कुजबूज दिसते आहे. गेल्या दोन वर्षांत ‘एआय’मुळं जागतिक स्तरावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, जनरेटिव्ह ‘एआय’मुळं अमेरिका आणि युरोपमध्ये अजूनही अनेक नोकऱ्या जाऊ शकतात किंवा त्यांचं स्वरूप बदलू शकतं.
‘एआय’ ही केवळ तंत्रज्ञानाची क्रांती नाही, तर नोकरी बाजारातील भूकंप आहे. त्याविरोधात जगभर कामगार संघटना आवाज उठवताना दिसत आहेत. याउलट अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनांवर समभागधारकांचा ‘एआय’ वापरून कंपन्या अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रचंड दबाव आहे. प्रश्न खूप आहेत आणि उत्तरं देणारं कुणी नाही, अशी अवस्था आहे. ही खरोखरीच एवढी मोठी समस्या आहे का? आणि अशा समस्यांना सामोरं जाणं ही जगाची पहिलीच वेळ आहे का? या प्रश्नाची उत्तरं जरूर शोधायला हवीत, पण अशी आपली सामूहिक गाळण उडवण्यापेक्षा मीमांसा करणं जास्त डोळसपणाचं ठरेल.