
आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असल्यास आता गुगलऐवजी एआयचा वापर केला जातो. एआयच्या मदतीने आपल्याला हवी ती माहिती अवघ्या काही क्षणात उपलब्ध होते; मात्र एआय ती माहिती घेतो तरी कुठून, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचा खुलासा नुकत्याच एका अहवालात करण्यात आला आहे.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर वाढल्यापासून प्रत्येक क्षेत्रात एकापाठोपाठ एक नवनवे संशोधन सुरू आहे. आपल्या सर्वांचेच आयुष्य सुकर करण्यापासून विविध क्षेत्रात कामाची उपयुक्तता वाढविण्यासाठी एआयची मदत घेतली जात आहे. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, कला, कॉर्पोरेट अशा नानाविध क्षेत्रापासून ते अगदी आपल्या दररोजच्या आयुष्यातही एआयचा सहज वापर सुरू आहे. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत आपण कल्पनाही न केलेल्या क्षेत्रातही एआयचा वापर करून अत्याधुनिक संशोधन सादर होताना दिसत आहे.
अगदी किरकोळ माहिती शोधण्यापासून ते सखोल अभ्यासपूर्ण संशोधन करण्यासाठी विविध एआय टूल्सचा वापर केला जातो. आपण केवळ प्रॉम्प्टरूपी सूचना केल्यानंतर अवघ्या काही क्षणात एआय आपल्याला हवी असलेली माहिती आपण सांगितल्याप्रमाणे उपलब्ध करून दिली जाते.