

Ajinkyatara Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजगड ही त्यांची पहिली राजधानी. ६ जून १६७४ रोजी त्यांनी रायगडावर राज्याभिषेक केला. ही स्वराज्याची दुसरी राजधानी. रायगडावरच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. संभाजी राजांच्या औरंगजेबाने केलेल्या अमानुष हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला प्रस्थान केले. तेथून त्यांनी सुमारे आठ वर्षे स्वराज्याचा कारभार केला. जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी. १७०० मध्ये राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी (दुसरे) यांचा राज्याभिषेक महाराणी ताराराणी यांनी १७०१ मध्ये विशाळगडावर केला. शंभूपुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे महाराणी ताराराणी पुत्र शिवाजी महाराजांच्या (दुसरे) वतीने राज्यकारभार पाहत होत्या. छत्रपती शाहू महाराजांची १७०७ मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी १७०८ मध्ये अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक केला. त्यामुळे अजिंक्यतारा ही स्वराज्याची पाचवी राजधानी झाली.