

Nitin Gadkari Remembers Ajit Pawar as a Leader Beyond Politics
E sakal
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री
अजित पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला बसलेला खूप मोठा धक्का आहे. महाराष्ट्राच्या गेल्या २५-३० वर्षांच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. प्रशासनावर पकड ठेवणारा, त्वरित निर्णय घेणारा आणि स्पष्ट बोलणारा असा त्यांचा लौकिक होता. जे काम होत असेल त्याला हो आणि जे होत नसेल त्याला नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. दिलखुलास स्वभावामुळे राजकारणापलीकडील मैत्रभाव ते सहजपणे जपत. त्यांच्या मृत्यूने साऱ्या महाराष्ट्रावर जबर आघात झाला आहे.
तब्बल चाळीस वर्षे अजितदादा राजकारणात, सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते अथक कार्यरत होते. महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांना ध्यास होता.
राजकीय नेत्यांना लोकांना, कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. त्यामुळे सातत्याने गोड बोलावे लागते. किंबहुना आपण स्पष्ट बोललो तर चुकीचा संदेश जाईल, असे अनेकांना वाटते. अजित पवार मात्र या रीतीला अपवाद होते. ते उत्तम प्रशासक होते, तसे ते स्पष्टवक्तेही महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाबद्दल आस्था ठेवणारा आणि जनतेवर प्रेम करून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा हा सिंह होता.
अजित पवार महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिल्यांदा आले आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून त्यांचा आणि माझा परिचय वाढला. त्यांची आणि माझी मैत्री ही राजकीय मतभेदांच्या पलीकडची होती.
आम्ही अनेक वर्षे विधिमंडळात काम केले. एकमेकांवर राजकीय टीका-टिप्पणी केली. परंतु, मैत्रभावात अंतर आले नाही. जनहिताच्या मुद्यावर मी काही आग्रह केला आणि ते त्यांनी मान्य केले नाही, असे घडले नाही. आणि दादांनी एखादा असा लोकहिताचा विषय माझ्यासमोर ठेवला तर तो मी सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही घडले नाही.
अजित पवार हे माझे राजकारणातले आणि राजकारणाच्या पलीकडले उत्तम मित्र होते. राजकारणात कधी जमते, कधी जमत नाही. कधी पार्टी सोबत असते, कधी नसते. ते बघून आम्ही मैत्री केली नाही. त्यामुळे सत्तेत असो वा नसो; त्यांचे व माझे संबंध पूर्वी होते, तसेच ते आज अखेरच्या क्षणापर्यंत होते. राजकीय पदे आणि भूमिका बाजूला ठेवून वैयक्तिक स्तरावरील मैत्रभाव आम्ही जोपासला हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.