
स्वातंत्र्यपर्व आणि भारतीय सिनेमा यांचे एक सुंदर सहचर्यांचं नातं जुळलं. या नवोन्मेषाच्या पर्वांत सिनेरसिकांसाठी चित्रपट आणि संगीत यांची एक मालिका अवतरली. राज कपूर, विमल रॉय आणि गुरुदत्त यांच्यासारखे कल्पक दिग्दर्शक भारतीय सिनेमासाठी एकेक अध्याय जणू लिहू लागले. तर व्ही. शांताराम, मेहबूब यांनीही कंबर कसली. यांच्या बरोबरीने आता संगीतकारांची दमदार फळी उभी राहिली. ‘दम भर जो उधर मुंह फेरे... मै उनसे प्यार कर लुंगी...’ या शृंगाराने सिनेसंगीताचे रसिक थरारून गेले.
पुण्याच्या ‘प्रभात’ स्टुडिओमधले दोन तरुण परिटाने केलेल्या शर्टच्या अदलाबदलीने एकत्र आले. साल १९४५. एक होते देव आनंद आणि दुसरे गुरूदत्त! मग डेक्कन जिमखान्यातील ‘लकी रेस्टॉरन्ट’मध्ये चहा घेताना, सायकलवरून पुणे आणि आसपासचा परिसर बघताना दोघे एक स्वप्न पाहत होते, चित्रपटनिर्मितीचे!