
हार जीत, यशापयश, कीर्ती-संपत्तीची हुलकावणी, तर कधी मेहेरनजर, कधी घोर उपेक्षा याचं भय न बाळगता चित्रपटसृष्टीत नित्य नवा खेळ चालतो. सत्तर-पंचाहत्तर वर्षे मागे जाता पुण्यात ‘अंमलदार’ चित्रपटासाठी पु. ल. देशपांडे कोणा नटांना नाही, तर ग. दि. माडगूळकर, के. नारायण काळे, पु. भा. भावे अशा साहित्यिकांना बोलावतात. ‘जीवन ज्योती’ या साध्या कौटुंबिक सिनेमातून पुढे गाजलेला ‘याहू’फेम शम्मी कपूर हलकेच प्रवेश करतो. सोहराब मोदींचे ‘झाँसी की रानी’चे भव्य स्वप्न भंगते. आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाच्या गळ्यात पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक पडते. रेडिओ सिलोनवरून ३ डिसेंबर १९५२च्या रात्री ऐकू आलेला विशीतल्या अमीन सयानींचा आवाज अनेक वर्षे निनादत राहतो आणि सांगतो, की चित्रपटसंगीताच्या उद्यानात मात्र वसंत ऋतू फुलला आहे.
चित्रपटनिर्मिती आणि लोकप्रियतेची भरती-ओहोटी असा खेळ स्वातंत्र्यानंतर विशेष रंगात आलेला होता. चित्रपट निर्माते उदंड झाले होते. रोज नवे चेहरे दाखल होत होते. रोज नवे साहस करणारे येत राहिलेले होते. ‘गुळाचा गणपती’ निर्माण करून चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम पुलंनी केला; पण त्या आधी गोगोलच्या ‘इन्स्पेक्टर जनरल’चा मराठी अवतार त्यांनी मराठी रजतपटाला बहाल केला. ‘नवकेतन’चा पहिलावहिला चित्रपटही याच कथेवर होता. पुलंनी चित्रपटासाठी विख्यात साहित्यिक पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, के. नारायण काळे यांना बोलावले होते. गोगोलच्या तिरकस, व्यंगात्मक विनोदाच्या मोहात पडलेल्या पुलंचा ‘अंमलदार’ पाहायला मिळाला तर हवा होता.