Ancient History of Ganesha
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - sakal.avtaran@gmail.com
श्रीगणेशाचा जसा धार्मिक, सांस्कृतिक आणि पौराणिक इतिहास आहे, तसाच त्याचा पुरातत्त्वीय संदर्भही प्रदीर्घ अन् प्राचीन आहे. श्रीगणेश अर्थात गणपतीचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदात आढळतो. मात्र, ऋग्वेदातील ‘गणपती’चा उल्लेख आजच्या श्रीगणेशाशीच संबंधित आहे की नाही, याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. ऋग्वेदात ‘गणपती’ हा शब्द ‘गणांचा प्रमुख’ या अर्थाने वापरला गेला आहे.
गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम्
अर्थ ः हे गणपती, आम्ही तुला गणांचा प्रमुख म्हणून आवाहन करतो... तू ज्ञानींमध्ये श्रेष्ठ ज्ञानी आहेस.
गणपतीचे सर्वात प्राचीन शिल्प इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात आंध्र प्रदेशातील अमरावतीमध्ये मिळते. अमरावतीमधील स्तूपाच्या समूहशिल्पात ते आहे. भारतातील गणेशाच्या सर्वात प्राचीन शिल्पांपैकी ते एक मानले जाते. विशेष म्हणजे, ती स्वतंत्र गणेशप्रतिमा नसून समूहशिल्पाचा एक भाग आहे आणि ती बौद्ध परिप्रेक्ष्यात आढळते. इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत गणेशाची ‘विनायक’ अशी प्रतिमा तयार झाली होती. ‘विनायक’ संकल्पनेचा संबंध विघ्नांशी जोडला गेला. त्याची उपासना केल्याने तो विघ्न दूर करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हटले गेले आहे.