

Indian Influence in Southeast Asia
esakal
डॉ. पुलिंद सामंत- sakal.avtaran@gmail.com
भारताचा सख्खा शेजारी असलेल्या म्यानमारने ते नाव १९८९ मध्ये धारण केले. त्याआधी तो ‘बर्मा’ होता, जो ‘ब्रह्मा’चा अपभ्रंश आहे. त्याचा शेजारी थायलंड १९३२ पर्यंत सयाम किंवा सियाम (Siam) होता, जो मूळ ‘श्याम’ नावाचा अपभ्रंश आहे.
गेल्या लेखात ‘विशाल भारत’ ऊर्फ आग्नेय आशियाची सांस्कृतिक ओळख निखालस भारतीय होती, असा उल्लेख होता. त्याचे थोडे स्पष्टीकरण असे - या भूभागाशी भारतीयांचा अडीच-पावणेतीन हजार वर्षांपासून विविध संदर्भांत आणि वाढत्या प्रमाणात संपर्क प्रस्थापित होत गेला. या प्रदीर्घ प्रक्रियेत तिथल्या इतिहासपूर्व (आणि नेमकेपणाने रेखांकित वा वर्णनांकित नसलेल्या) स्थानिक लोकसंस्कृतीवर तत्कालीन भारतीय संस्कृतीचे संस्कार होत गेले आणि ते सहज स्वीकारले गेले. काही पायाभूत संस्कारांचे रोपण, त्यावर वेळोवेळी होत गेलेले लेपन आणि त्याचे नूतनीकरण यामुळे त्या भूभागाचे आणि लोकसंस्कृतीचे ‘भारतीयीकरण’ झाले होते. त्या अर्थाने भारतीय प्रवाशांनी आणि स्थलांतरितांनी आग्नेय आशियाला प्राचीन काळापासून संस्कारित केले किवा त्याचे संस्कृतीकरण केले, असे म्हणायला हरकत नाही.