

Indian History and Warfare
esakal
पुराणातले राम व रावण यांच्या सैन्याचे घनघोर युद्ध किंवा महाभारतामध्ये वर्णिलेले अनेक रथी-महारथींचे युद्ध असो. या भूमीत अनेक युद्धप्रसंग असे घडले की ज्यामुळे इथला इतिहास - आणि भूगोल बदलला त्याचबरोबर जनमानसावर त्याचा प्रभाव पडला. यामध्ये छत्रपती शिवरायांच्या लढायांना वेगळेच महत्त्व आहे. याच लढायांचा आढावा या सदरातून घेतला जाईल....
प्राचीन काळी भारत हा वैभवशाली देश होता. शिल्पकला, योगशास्त्र, भाषा, संगीत, अध्यात्म, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र इ. बाबी याच्या साक्षी आहेत. याशिवाय उपनिषदे, पुराणे, बौद्ध-जैन ग्रंथ इत्यादी ग्रंथांमधील उच्चकोटीच्या तत्त्वज्ञानाचे केलेले विश्लेषण. नालंदा, विक्रमशीला, तक्षशीला या विद्यापीठांमधून दिले जाणारे विविधांगी शिक्षण व या निवासी विद्यापीठांमध्ये विद्याभ्यास करणारे देशोदेशीचे हजारो विद्यार्थी इत्यादी गोष्टी त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळेच आपण असे म्हणतो किंवा इतिहासातून ऐकतो, की बहुतांश ज्ञान हे भारतातून सर्व जगभर पसरले. याच भूमीत राम व रावण यांच्या सैन्याचे घनघोर युद्ध झाले आणि महाभारतामध्ये वर्णिलेले रथीमहारथींचे युद्ध येथेच झाले. याखेरीजही अनेक युद्धप्रसंग घडले की ज्यामुळे इथला इतिहास-भूगोल बदलला आणि जनमानसावर खोलवर प्रभाव पडला. या उत्क्रांतीच्या अगदी सुरुवातीपासून संघर्ष, झुंज, लढाई, युद्ध माणसाच्या सोबतीला आहेत. आजपर्यंत अनेक राज्यकर्ते या भारतभूमीवर होऊन गेले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या साधनांसह भौगोलिक स्थितीचा योग्य वापर करून बलाढ्य शत्रूंना नमविण्याचे अतुलनीय कौशल्य जगाला दाखवून दिले. त्याचाच आढावा या लेखमालेत आपण घेणार आहोत.