

Ancient Indian wars
esakal
माणूस हा उपजतच संघर्षशील प्रवृत्तीचा आहे. म्हणूनच उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच माणूस निसर्गाशी व पुढे समूहाशी संघर्ष करीत आला आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात ‘युद्ध’ हा अत्यंत परिणामकारक घटक आहे. परस्परांशी शत्रुत्वाचे नाते असलेल्या दोन पक्षांनी स्वतःच्या हिताच्या रक्षणार्थ हातात शस्त्रे धारण करून परस्परांशी लढण्यास सिद्ध होणे म्हणजे ‘युद्ध’ अशी व्याख्या शुक्रनीती या ग्रंथात केल्याचे दिसून येते. युद्ध, युद्धानंतर काही काळ अस्वस्थ शांतता, त्या शांततेच्या पोटात भावी युद्धाची बीजे आणि ती बीजे रुजली, वाढली की पुन्हा युद्ध...! असे असंख्य वाद, विवाद, युद्धे, क्रांती, घटना यांनीच जगाच्या इतिहासाची पाने भरलेली आहेत. राज्ये जन्मली, वाढली, बुडाली. जय-पराजय होत राहिले. कोणत्याही देशाचा इतिहास याला अपवाद नाही.
भारताचा प्राचीन इतिहासही अनेक संघर्षांनी आणि युद्धांनी व्यापलेला आहे, ज्यांनी केवळ इतिहास-भूगोलच बदलला नाही, तर भारतीय संस्कृतीची दिशाच बदलली. या युद्धांच्या कथा शेकडो वर्षे होऊन देखील आजही सांगितल्या जातात, अभ्यासली जातात आणि त्याप्रमाणे लढलीही जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अशाच काही प्राचीन युद्धांचा, युद्धनीतींचा अभ्यास करून आपल्या आयुष्यात डावपेच रचले, व्यूहरचना आखली. त्यामुळे अशा काही ऐतिहासिक आणि प्रभावशाली युद्धांबाबतची आपण माहिती घेणे आवश्यक आहे.