
अमोघ वैद्य
लोमस ऋषी लेणं हे भारतातील लयनस्थापत्यातील सर्वांत जुनं लेणं आहे. या लेण्याला भारताच्या संपूर्ण वास्तुशास्त्रातला मैलाचा दगड म्हणतात. इथल्याच खडकात सर्वप्रथम ‘चैत्य कमान’ आढळते, नंतर ती अजिंठा, कान्हेरीपर्यंत पोहोचली. लोमस ऋषी लेण्याचं प्रवेशद्वार म्हणजे खडकात कोरलेलं एक अप्रतिम शिल्प आहे.
बिहारमधील बोधगयेपासून ४४ किलोमीटरवर असलेल्या खळखळणाऱ्या फाल्गु नदीच्या पाण्याजवळ ग्रॅनाईटच्या टेकड्यांवर बाराबर लेणी उभ्या आहेत. मौर्य राजवंशाच्या काळातील हातांनी कोरलेल्या या लेणी म्हणजे जणू खडकांतली इतिहासाची पानं आहेत.