
राहुल गडपाले - rahulgadpale@gmail.com
मानवसदृश गुणधर्म, भावना, हेतू इतर प्राणी, वस्तू, निसर्ग किंवा अमानवी घटकांमध्ये लावणे किंवा दर्शवणे म्हणजे अँथ्रोपोमॉर्फिझिंग. मराठीत याला ‘मानवसदृशता दर्शवणे’ किंवा ‘मानवीकरण’ असे म्हणतात. माणूस आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या तराजूत मोजून बघण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या बुद्धिचातुर्याचा तुरा मिरवताना इतर सजीवसृष्टीच्या बुद्धीचे मापनही तो आपल्याच कलाने करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या बुद्धिचातुर्याचे सौंदर्यदर्शन करताना इतर प्राण्यांमध्ये असलेले चातुर्यही मानवी नजरेतून पाहण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. त्यामुळेच मानवापूर्वी पृथ्वीवर ऑक्सिजनचा वापर करीत असलेली झाडे असोत किंवा साधनांचा हत्यारासारखा वापर करून अन्न मिळवण्यात यशस्वी झालेले ॲबेल आणि बेट्टी नावाचे विस्मयचकित करणारे कावळे असोत, ते आपल्या बुद्धिचातुर्याच्या स्पर्धेत माणसापेक्षा कमी नाहीत, हे मान्य करायलाच हवे.