कृषी योजना अनेक, ‘एक शेतकरी-अर्ज एक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी योजना अनेक, ‘एक शेतकरी-अर्ज एक’}

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी नवीन उपक्रम आणि योजना सुरु केल्या.

कृषी योजना अनेक, ‘एक शेतकरी-अर्ज एक’

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. या योजना पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कृषी विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नवीन उपक्रम आणि योजना सुरु केल्या. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ‘एक शेतकरी- एक अर्ज.’ यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून घेता येणार आहे.

हेही वाचा: स्टार्टअप म्हणजे काय? कसे काम करते? कशी करावी सुरुवात?

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. त्यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होत होता. शिवाय बऱ्याच वेळा मागणी केलेल्या घटकाचा लाभही मिळत नव्हता. लाभार्थी निवडताना विविध स्तरावरच्या हस्तक्षेपामुळे योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहचत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी असते.

या समस्यांवर उपाय शोधत असताना कृषी विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला. ‘महाडीबीटी’ प्रणाली विकसित करुन ‘एक शेतकरी- एक अर्ज’ ही संकल्पना अमलात आणली. या प्रणालीमुळे केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेणे शक्य होणार आहे. चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राह्य धरण्याची सुविधाही आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी या प्रणालीव्दारे शेतकरी घरबसल्या अर्ज करु शकतो. आपल्या अर्जाची सद्य:स्थिती मोबाईल अॅपद्वारे पाहू शकतात. तसेच, योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रेही अपलोड करू शकतात. जास्त अर्ज आल्यास संगणकीय सोडतीद्वारे प्रत्येक तालुका निहाय लाभार्थी शेतकऱ्यांची पारदर्शी निवड केली जाते. अर्ज करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतचा प्रवास मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्णतः संगणकीकृत करून विकासाच्या योजना ऑनलाइन सोडत पद्धतीने राबविणारा कृषी विभाग राज्यातील पहिलाच विभाग आहे. विभागाच्या सर्व प्रमुख योजनांची अंमलबजावणी आता ‘महाडीबीटी’ प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा: भारतात रस्त्यांचा शोध कधी लागला? कसा झाला त्यांचा विकास, जाणून घ्या

२२ लाख शेतकरी ‘महाडीबीटी’वर :

वर्षभरात २२ लाख शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ प्रणालीवर नोंदणी केली आहे. वेगवेगळ्या योजनांतर्गत ५५ लाख घटकांची मागणी करून कृषी विभागाच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला आहे. वर्षभराच्या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी ही प्रणाली आत्मसात केली आहे, ही समाधानाची बाब आहे. २३ मार्च २०२१ रोजी या प्रणालीव्दारे पहिल्या शेतकऱ्यास अनुदान वितरित झाले होते. आज वर्षभरानंतर ३ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी विविध घटकांची अंमलबजावणी पूर्ण केली आहे. कृषी विभागाने २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ८२० कोटी रुपये अनुदान प्रत्यक्ष डीबीटीव्दारे वर्ग केलेले आहेत. उर्वरित ४०० कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च २०२२ अखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. एका वर्षात डीबीटीव्दारे १२०० कोटींचे अनुदान यशस्वीरीत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

ही प्रणाली नावीन्यपूर्ण असल्यामुळे प्रारंभी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही प्रणाली समजून कार्यवाही करण्यास थोडा वेळ लागला. ही प्रणाली समजावून सांगण्यासाठी वेळोवेळी ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना वेळीच योजनांचा लाभ मिळावा म्हणून कृषी मंत्री, प्रधान सचिव आणि आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरून आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे ही प्रणाली वर्षभरातच सुरळीतपणे मार्गस्थ झालेली आहे. या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांच्या गरजेनुरूप वरचेवर सुधारणा करण्यात आल्या असून महा- T- डीबीटी प्रणाली अधिकाधिक शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी सोपी करण्यात येत आहे. ‘महाडीबीटी’ प्रणालीस शेतकऱ्यांनी दिलेला मोठा प्रतिसाद आणि वर्षभरातील अनुदान वितरणामध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान पाहता शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे. अल्पावधीत ‘एक शेतकरी - एक अर्ज’ हा उपक्रम आणि ‘महाडीबीटी’ प्रणाली लोकप्रिय झाली आहे, असेच म्हणावे लागेल. या प्रणालीमुळे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात कृषी विभाग यशस्वी झाला आहे.

हेही वाचा: केवळ तीन सेकंदांच्या व्यायामाने व्हा तंदुरुस्त!

संकेतस्थळ :

https://mahadbtmahait.gov.in/

कृषी विभागाच्या योजना :

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART)

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

‘विकेल ते पिकेल’ अभियान

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ ते २०२२-२३

फळबाग लागवड

फुलपिके लागवड

फळपीक विमा योजना २०२०-२१ ते २०२२-२३

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा (कर्जाच्या व्याजावर ३ टक्के सवलत)

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

हरभरा व गहू बियाणे साठी अनुदान (ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम २०२०१-२२)

उन्हाळी हंगाम २०२१-२२ भुईमूग बियाणे अनुदान- ग्राम बिजोत्पादन

शेतीशाळा / पोकरा अंतर्गत शेतीशाळा

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रिय शेती)

नवीन विहीर (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

शेततळे (पोकरा अंतर्गत) मग्रारोहयो अंतर्गत

ठिबक व तुषार सिंचन - (प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत)

ट्रॅक्टर व इतर औजारे - (कृषी यांत्रिकीकरण उपअभियान)

सामुदायिक शेततळे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

शेततळे अस्तरीकरण, शेततळे अस्तरीकरण

पंप संच व पाइप लाईन साठी अनुदान / पंप संच व पाइप (पोकरा अंतर्गत)रेशीम उद्योग (रेशीम संचालनालय मार्फत योजना) / रेशीम उद्योग (पोकरा अंतर्गत)

मधुमक्षिका पालन (रा. फ. अ. अंतर्गत) / मधुमक्षिका पालन (पोकरा अंतर्गत)

अळिंबी उत्पादन प्रकल्प

हरितगृह

शेडनेट

मिनी दाल मिल

बीज प्रक्रिया युनिट

गोदाम बांधकाम

शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणी साठी मिळणारे अर्थसाहाय्य

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

‘आत्मा’ अंतर्गत बचत गटांची नोंदणी

हेही वाचा: फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!

शेतकऱ्यांना कोठूनही अर्ज करणे शक्य :

शेतकरी कोणत्याही वेळी आणि कोठूनही डीबीटीच्या पोर्टलवर नोंदणी करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती, आयडी वापरून कधी पाहू शकतात. पडताळणी आणि पारदर्शकतेसाठी सातबारा उतारा, आठ अ प्रमाणपत्र आधार, संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत आणि खरेदी पावतीची प्रत अपलोड करू शकतात. शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येते.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

शेतकऱ्यांना महाडीबीटीवर २०१७-१८ या वर्षापासून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. कृषी योजनेसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे तसेच अर्जदार पात्र आहे किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी अर्जदाराची असणार आहे. मात्र, अर्ज चुकीचा असल्यास कोणत्याही स्तरावर आल्यानंतर तो रद्द करण्यात येईल. अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व तपशील योग्य आहे, का हे अर्जदाराने तपासून घ्यावे. कृषी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाइनद्वारे राहील. अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.

शेतकऱ्यांसाठी आवश्यक पात्रता :

शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक.

शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र आवश्यक आहे.

शेतकरी एससी, एसटी जातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही. जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.

हेही वाचा: 'कोरोनाकाळ' मानवी जीवनावर आघात...

शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाची ताजी प्रत सादर करावी लागेल.सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.

शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.

शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात. (विविध कृषी योजनांच्या अनुदानासाठी पात्रता निकषांमध्ये काही बदल होतील.)

आवश्यक कागदपत्रे :

७/१२ प्रमाणपत्र

८-ए प्रमाणपत्र

वीज बिल

खरेदी केलेल्या संचाचे बिल

जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

स्वयं घोषणापत्र

पूर्वसंमती पत्र

हेल्पलाइन क्रमांक ०२२- ४९१५०८००

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top