
विविध क्षेत्रांत ‘एआय’चा वापर करताना सर्व्हर, मायक्रोप्रोसेसर यांच्यासाठी पाणी आणि ऊर्जेची प्रचंड गरज भासणार आहे. ती पूर्ण करताना कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यावरणासाठी कितपत अनुकूल आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
दा गिने, दात, रंग, स्वाद,केस, रबर, धागे, चामडे - अशा गोष्टी कृत्रिम असू शकतात, पण बुद्धिमत्तादेखील कृत्रिम असू शकते यावर आपल्या आजी-आजोबांचा विश्वास बसणार नाही. निदान बुद्धिमत्ता तरी अस्सल हवी असंच ते म्हणतील. मात्र, सध्याच्या काळात ‘युगे’ झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे येऊ घातलेलं युग आर्टिफिशियल इंटलिजन्स (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे.
यंत्रांना, संगणकांना, संगणकप्रणालीला मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे सक्षम बनवायचं आणि त्यांना भाषा शिकवून विचार करायला लावायचं, निर्णय घ्यायला लावायचं. त्यांच्याकडून विविध किचकट कामे कमी वेळेत करून घ्यायची. विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, करमणूक, व्यापार, माहितीचे पृथक्करण, औद्योगिकक्षेत्र येथे एआयचा वापर सुरू झाला आहे. एआयच्या मदतीने आवाज/चेहरा आणि हस्ताक्षरांमधील साम्य/फरक ओळखताना मदत होते. आरोग्य, वित्तीयसेवा, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, हवामान, कृषिक्षेत्रासह विविध प्रकारच्या शिक्षण-संशोधनात एआयचा वापर केला जातोय. अनेक घरांमध्ये अलेक्सा, सिरी किंवा गुगल असिस्टंट यांना ‘हुकूम’ देऊन विशिष्ट गाणे लावायला सांगितले जाते.