

Artificial Super Intelligence
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
आपण एका अशा युगाच्या उंबरठ्यावर आहोत जिथे सगळं काही बदलणार आहे. ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’बद्दल काही अंदाज करता येतील पण ते अंदाजच असतील. ‘एआय’ हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही, तर ती मानवी इतिहासातली सर्वांत मोठी क्रांती आहे. आपण आज जे विचार करतो, जे स्वप्न पाहतो, त्याही पलीकडचं जग हे ‘एएसआय’ निर्माण करणार आहे.
गेल्या दोन भागांमध्ये आपण ‘एआय’च्या प्रवासाविषयी बरंच काही जाणून घेतलं, पण आज जो विषय आपण मांडणार आहोत तो वाचताना कदाचित आपल्याला मानवजातीचं आता पुढे काय होईल अशी शंका आल्याशिवाय राहणार नाही. आपण आता बोलणार आहोत ‘एएसआय’ (ASI) म्हणजेच ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’बद्दल. सोप्या भाषेत सांगायचं तर, ही अशी बुद्धिमत्ता असेल जी जगातल्या सगळ्यात हुशार माणसापेक्षाही कित्येक पटीनं जास्त प्रगत असेल. हे फक्त गणिताची उत्तरं देणारं यंत्र नसेल, तर ते स्वतःच विचार करेल, स्वतःच स्वतःचे निर्णय घेईल आणि कदाचित आपल्याला न समजणारी अशी नवी भाषा निर्माण करेल किंवा विज्ञानाचे नवे नियमही शोधून काढेल.