
मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे.
प्रबळ इच्छाशक्ती! एका रुग्णाची कहाणी
मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करायची ठरवली आहे, त्याच्यावर तुमचे मन केंद्रित करा. एकाग्रतेमुळे मनाची शक्ती वाढते. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग असून ती एक अमूर्त शक्ती आहे. त्याची प्रचीती माणसाच्या कार्यातूनच येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतील इच्छा किंवा मानोरथ नव्हे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते, ती म्हणजे इच्छाशक्ती! इच्छांची पूर्तता होण्यासाठी नतिक शक्ती आणि निश्चय असावा लागतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होते, अशीच एका डॉक्टर आणि रुग्णांची कहाणी आहे.
"एका चार वर्षाच्या मुलाला माझ्याकडे बारामतीहून चिट्ठी देऊन पाठवले होते. त्या मुलाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्या लहान मुलाला ‘‘मेड्युलोब्लास्टोमा’’नावाची सेरेबेलम किंवा लहान मेंदूत उद्भवणारी ही गाठ होती. त्याला उलट्या, प्रचंड प्रमाणात डोकं दुखणे, चालताना तोल जाणे, अशी लक्षणे होती. ही गाठ सामान्यत: लहान मुलांमध्ये दिसून येते आणि मेंदूच्या आणि मणक्याच्या जंकशन ( ब्रेन स्टेम) च्या अगदी जवळ असते. या मुलाचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या अथक प्रयत्न आणि प्रार्थना नंतर चौदा वर्षांनंतर झाला. तो ‘‘नवसाचा मुलगा’’ होता. सर्जन म्हणून आपण बऱ्याच घटनांचा सामना करतो, जे विज्ञान खरोखरच कधीच स्पष्ट करू शकत नाही. जर कोणी मला विचारले की नवस, देव यावर विश्वास आहे का? तर मी काहीच न बोलणे स्वीकारतो. हे असे क्षेत्र आहे ज्याची कधीही तपासणी किंवा पुष्टी केली जाऊ शकत नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांची मर्यादा आणि शक्यतो कोणत्याही दैवी शक्तींच्या आशीर्वाद याचे ज्ञान नाही, हे आपण अत्यंत नम्रपणे स्वीकारले पाहिजे, असे डॉ.डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेन्टरचे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे सांगतात. पण प्रबळ इच्छाशक्ती असल्यावर रूग्ण कसा बरा होतो, याची कहाणी आपण वाचणार आहोत...
तीन वर्षांपूर्वी डॉ. रानडे या मुलाची शस्त्रक्रिया केली आणि पूर्ण ट्युमर यशस्वीपणे काढला. जेव्हा त्याच्या आईवडिलांचा आणि विशेषत: मुलाच्या अगदी जवळ असलेल्या त्याच्या मामाशी सल्लामसलत केली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले होते. पण शस्त्रक्रिया केली आणि देवाच्या कृपेने गाठ पूर्ण काढून टाकली. मुलाने खूप चांगली प्रगती केली आणि प्रोटोकॉलनुसार संपूर्ण मेंदूला आणि पाठीच्या मणक्याला रेडिओ थेरपी देण्यात आली. शस्त्रक्रिया करताना कोणत्याही घातक गाठीतल्या पेशी पसरू शकतात आणि त्यानंतर मज्जासंस्थेमध्ये त्यांचे रोपण होऊ नये, म्हणून रेडिओथेरपी दिली जाते. त्याला सुमारे तीन सायकल रेडिओथेरपी दिली आणि तो फारच चांगला प्रतिसाद देत होता. पण जवळपास तीन महिन्यांनतर त्याला अत्यंत विचित्र अवस्थेत परत रुग्णालयात आणण्यात आले. तो काहीच बोलत नव्हता आणि तो निःशब्द होता. तो वेदनांना प्रतिसाद देत असे आणि रडत असे, दोन चार घास खात होता व अंथरुण धरून होता. ‘सेरेबेलर म्युटिझम’ म्हणून ओळखली जाणारी ही एक अतिशय विचित्र अवस्था असते. ऑपरेशन करताना सेरेबेलर वर्मीस, हा सेरेबेलमच्या मध्य भाग उघडून ट्यूमर काढावा लागतो. त्यामुळे काही रुग्णांना ‘‘सरेबेलर म्युटीसम’’ किंवा मुकेपण भोगावे लागते. डॉक्टर रानडे नातेवाईकांना धीर देण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हते. मुलाच्या मामाने त्यांना बाजूला घेतले आणि विचारले की प्रतीक्षा व्यतिरिक्त अधिक काही शक्य आहे का? मामा म्हणाला, आपल्या मालकीची थोडीफार जमीन विकून उपचारासाठी पैश्याची व्यवस्था करतो. परंतु त्याला वाचवा.
तो वाचला पण, त्यानंतर, मुलाला अत्यवस्थ परिस्थितीत पुन्हा तीन महिन्यांनंतर आणले गेले. सीटी स्कॅनमध्ये त्याला हायड्रोसेफलस असल्याचे समोर आले. मेंदूच्या पोकळी (वेंट्रिकल्स) मध्ये पाणी तुंबले होते. ज्यामुळे दाब वाढतो आणि रुग्ण बेशुद्ध देखील होतो. मी दुसरी शस्त्रक्रिया करून शंट बसवला. आई-वडील खूपच दुर्बल होते. भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मुलाचे संपूर्ण जबाबदारी मामा घेत होता. मामाचे भाच्यावर अतिशय प्रेम आणि जीव होता. त्याची सकारात्मकवृत्ती यामुळे माझ्यामध्येही तीव्र आशावाद निर्माण झाला. थोडी सुधारणा झाल्यानंतर त्याला परत घरी सोडण्यात आले. तो अजूनही निःशब्द राहिला आणि मी त्याच्या सुधारण्याची केवळ प्रार्थना करू शकत होतो. त्यानंतर, त्याला तीन वेळा आमच्या रुग्णालयात शंट ब्लॉक झाल्यामुळे आणले गेले. एका प्रसंगी डॉक्टरांनी जवळ जवळ आशा सोडली आणि मामला सांगितले की परिस्थिती आता वाईट आहे आणि यापुढे सुधारणा होणे कठीण दिसते. तरी मामाने हट्ट सोडला नाही. मामाचे भाच्यावरचे प्रेम पाहून मला अश्रू अनावर झाले. काही लोकं कधीच हार मानत नाहीत. त्याची चिकाटी खरच कमालीची होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी मला मामाचा फोन आला. त्याने सांगितले की तो रुग्णवाहिकेत भाच्याला घेऊन येतोय. रुग्ण जवळजवळ बेशुद्ध होता, केवळ बोटांची हालचाल करत होता. त्याला नाकातून ट्यूबद्वारे अन्न देण्यात येत होते. मी खूप उदास झालो. शंट पुन्हा दुरुस्त करण्याची शस्त्रक्रिया मी केली आणि एका आठवड्यानंतर मुलाला सोडण्यात आले. खरोखरच त्यात कोणतीही विशेष सुधारणा झाली नव्हती. डॉक्टरांनी मामला सांगितले की, जे करता येईल ते मी केले. मामा माझ्या पाया पडले. मला गहिवरून आले. हार मानण्यास नकार देणारा, हार मानलेल्याच्या पाया पडला. इतक्या श्रद्धेच्या मी पात्र नक्कीच नव्हतो. मी पुन्हा माझे मन शांत केले आणि त्याला सांगितले की माझ्या शुभेच्छा नेहमीच रुग्णाच्या पाठीशी आहेत.
तीन दिवसांपूर्वी मला मामाचा फोन आला. तो उत्साहित वाटत होता. त्याने मला सांगितले की त्याचा भाचा सुधारला आहे आणि त्याला तुम्हाला भेटायला आणायचे आहे. मला वाटले की त्याचे प्रेम आणि आशावाद ह्यामुळे मनाचे सांत्वन करण्यासाठी त्याला घेऊन येत असावा. मी त्याला सांगितले की सोमवारी मला भेट. इतर रुग्णावरील शस्त्रक्रिया संपल्यानंतर मी माझ्या बाह्यरुग्ण विभागात आलो आणि मला माझ्या आयुष्याचा धक्का बसला. तो मुलगा खुर्चीवर बसून हसत हसत प्रश्नांची उत्तरे देत होता. चार पावले चालून दाखविले मला त्या मामाच्या पाया पडायचे होते. हे अविश्वसनीय होते. मामाने माझ्यासाठी प्रेमाने आणलेली मिठाई खात असताना मी त्या व्यक्तीला आणि त्याच्या श्रद्धेला, चिकाटीला अभिवादन केले. त्याने हार मानण्यास नकार दिला. देव अस्तित्त्वात आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु जर तो असता तर मला खात्री आहे की, मामाची भक्ती आणि समर्पण आणि भाच्यावरील प्रेमामुळे त्याने मुलाचे भविष्य पुन्हा लिहिले असते. त्याने मला दिलेली मिठाई आतापर्यंत सर्वात रुचकर लागल्याचे डॉ. रानडे आवर्जून सांगतात.
तात्पर्य:
इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी समांतरच आहेत. इच्छा जर प्रबळ असेल तर माणसाला कार्यप्रवृत्त करते. इच्छाशक्तीचे माणसात सुप्तावस्थेत असते. माणसाची बुद्धी आणि इच्छाशक्ती यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. बिहारची अरुणिमा सिन्हाचं उदाहरण सर्वश्रुत आहे. एका पायाने अधू झालेल्या अरुणिमाने अपघात झाल्यापासून दोन वर्षांत एव्हरेस्ट सर केला. सर्वसामान्य माणसाला शक्य नसणारी गोष्ट तिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य केली. पद्मश्री देऊन भारत सरकारने तिचा गौरव केला. तात्पर्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सर्व साध्य करू शकतो.