
केदार फाळके
editor@esakal.com
वयाच्या चाळिशीनंतर औरंगजेबाने स्वतःला राज्याभिषेक अर्थातच ताजपोशी करून घेतली. दिल्लीमध्ये एक भव्य मिरवणूक निघाली. मुसलमान ताजपोशींमध्ये मिरवणूक आवश्यक नव्हती, तरीही ती आयोजित करण्यात आली. सुरूवातीला ढोल, नगारे, बिगुल आणि शिंगे वाजविली जात होती. त्यामागून रत्नजडित, झूलयुक्त, सोन्याच्या घंटा आणि चांदीच्या साखळ्यांनी सुशोभित केलेल्या भव्य हत्तींचा रिसाला चालला होता. त्यांच्यामागे रत्नजडित लगाम आणि सजावट केलेले घोडदळ होते. नंतर उंट आणि मादी हत्ती होते. मग होते बंदूकधारी सैनिक. यानंतर सर्वांत शेवटी औरंगजेब होता. तो सोन्याच्या तख्तावर बसून शाही हत्तीवर आरूढ झाला होता.
मुघल सल्तनतीत अनेक भव्य ताजपोशी झाल्या, पण त्यामध्ये औरंगजेबाची ताजपोशी (राज्याभिषेक) ही सर्वांत भव्य आणि प्रभावी होती. शाहजहानाला मुघलांचा सर्वांत वैभवशाली बादशाह मानले जाते, तरीही त्याची ताजपोशी १६२८ मध्ये झाली, तेव्हा त्याने अजून तख्त-ए-ताऊस तयार केले नव्हते आणि प्रसिद्ध कोहिनूर हिरा त्याच्याकडे आला नव्हता. त्याचप्रमाणे, त्याचे संगमरवरी महाल—जसे आग्रा आणि दिल्लीतील— जे आजही लोकांना प्रभावित करतात, ते देखील त्या वेळी अस्तित्वात नव्हते. पण औरंगजेबाच्या ताजपोशीच्या वेळी या सर्व गोष्टी उभ्या होत्या आणि म्हणूनच त्याच्या समारंभाचा भपकेबाजपणा अधिकच उठून दिसतो.