अयोध्या : रामराज्याचे द्वार

अयोध्या : रामराज्याचे द्वार

व्हायरसप्रुफ अशा मनोसंकल्पनेने (प्रोग्रॅमने) तयार केलेली अयोध्यानगरी. जिच्यात युद्ध नाही, जी युद्धाने जिंकण्यासारखी नाही. बाहेरचा शत्रू आक्रमण करून आला तरच युद्धप्रसंग येतो, असे नाही. मनुष्याचे स्वतःशीही युद्ध असते. चांगल्या- वाईटाचा निर्णय कसा घ्यावा, अशा संभ्रमावर विजय मिळविण्यासाठी आवश्यकता असते विवेकाची, अंतःप्रेरणा आणि दिव्यदृष्टीची! अशा प्रकारची सर्व योजना असलेली अयोध्या. येथील माणसांचे एकमेकांशी किंवा स्वतःशीही भांडण नसे. द्वापारयुगाची पूर्ण कल्पना प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केलेली ही नगरी आणि तेथील रहिवाशांचे प्रतीक म्हणून राज्य करणारे प्रभू श्रीराम.

श्री रामांनी वर्षानुवर्षे राहून राज्यतपस्या केली, लोकांच्या राष्ट्रप्रेमामध्ये वाढ केली, अशी ही अयोध्या. अयोध्येमुळे श्रीराम, की श्रीरामांमुळे अयोध्या? श्रीराम व अयोध्या हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. प्राचीन काळापासून वैवस्वत मनूचा मुलगा इक्ष्वाकू याने वसविलेली नगरी अयोध्या. ज्यांना सच्चिदानंद परमात्म्यात विलीन होण्यासाठी सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्त होण्याची इच्छा असेल, त्यांनी ज्या ठिकाणी वास करावा, अशा ठिकाणांपैकी पहिली असणारी मोक्षदायिनी अयोध्या. 

मनुष्य शरीराशी तुलना केली, तर अयोध्या ही मणिपूर चक्राच्या ठिकाणी असते. श्रीरामांनी जन्म घेण्यासाठी केलेली तयारी म्हणजे अयोध्या आणि श्रीरामांना जेथे जन्म घ्यावा, राज्य करावे, असे वाटावे, अशी ही अयोध्या. श्रीराम या नावातच तेज वास्तव्य करते. शक्तीच्या ‘रं बीजा’चा पृथ्वीलोकावर वास्तव्य करण्यासाठी जो अवतार झाला, तो रामावतार. अग्नितत्त्वाला कार्यरत करून, त्याचा लोकांना त्रास न होता जीवन समृद्ध, सुखी एवढेच न करता असे जीवन असावे, असा राज्यकर्ता असावा, असे युगानुयुगे वाटायला लावणारे हे श्रीराम. चार युगांमधील द्वापारयुगाचा गुणधर्म समजावणारे ते श्रीराम.

लहानपणीच राजगृह सोडून वनात जाऊन ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेणारे असे श्रीराम. आश्रमात शिक्षण घेण्याबरोबरच पुढच्या कार्यक्रमाची चुणूक दाखवण्याच्या दृष्टीने आश्रमाचे रक्षण करण्यासाठी ताटिका, खर-दूषण वगैरे राक्षसांचा वध करून माणसांना भीतीमुक्त करण्याचे कार्य करणारे श्रीराम. जनकनंदिनी सीतेच्या स्वयंवराप्रीत्यर्थ आमंत्रण आल्यावर गुर्वाज्ञेनुसार प्रवास करून मिथिलेला स्वयंवराला गेलेले श्रीराम. स्वतःच्या इंद्रियसुखासाठी स्त्रीला दासी वा जड वस्तू समजून तिच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करणे, तिच्या मागे लागणे, तिला वेगवेगळी आमिषे दाखवणे, शरीरसुखाची इच्छा धरून तिच्याशी लग्न करणे, हा पुरुषार्थ नव्हे हे सांगण्यासाठी योजलेल्या संपूर्ण कार्यक्रमात श्रीरामांनी भाग घेतला होता. घरच्या मंडळींना, आई-वडिलांना तसेच नातेवाइकांना काहीही न सांगता, स्त्रीप्राप्तीची इच्छा न धरता, जनकनंदिनीने श्रीरामांना वर म्हणून निवडल्यामुळे तिच्याशी लग्न करणारे श्रीराम. एखादा राजपुत्र किंवा धनाढ्य पैसेवाला मनुष्य हेरून त्याच्याशी लग्न करणाऱ्या स्त्रिया अनेक असतात; परंतु ऋषीवेषात असलेल्या, ऋषींबरोबर आलेल्या ज्या राजकुमाराचे सामर्थ्य ओळखून, ज्यांचे तेज पाहून सीता लग्नाला तयार झाली ते श्रीराम. स्वतःच्या बाहूंमधील ताकद उद्धटपणाने न दाखवता ऋषींनी आज्ञा दिल्यावरच स्वयंवराचा पण पूर्ण करण्यासाठी शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करणारे श्रीराम. लग्नानंतर अयोध्येला परत आल्यावरही हे कुठले लग्न, असे कसे लग्न केले, वगैरे प्रश्न न काढता ज्यांच्या स्वागताचा भव्य सोहळा अयोध्यावासीयांनी केला ते सीता-राम. शिक्षण संपलेले आहे, लग्न झालेले आहे, अशा वेळी श्रीरामांनी राज्यकारभार सांभाळावा, या विनंतीला मान देऊन राज्यकारभार स्वीकारायला तयार झालेले प्रभू श्रीराम व त्यांची सहधर्मचारिणी सीता. परंतु, ऐनवेळी राज्यपद व महाराणीपद सोडून ‘वनवासाला जा,’ ही वडिलांची आज्ञा पाळणारे सीताराम. अशा घटना आज घडू शकतात का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. वडीलमाणसे, गुरू, ऋषी यांच्याबद्दल द्वापारयुगात असलेला आदर, कुटुंबीयांचा विश्वास, भावाभावांतील प्रेम, आदर, स्वतःचा पती निवडण्याचा स्त्रीला असलेला अधिकार, हे सर्व दाखविणारा द्वापारयुगाचा काळ म्हणजे रामराज्य.

वनवासाला जात असता शरयू नदीवर नौका चालविणाऱ्या नावाड्याचा उद्धार करून, लोकसंग्रहाला सुरुवात करून, कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव न ठेवता छोटी-मोठी माणसे आपलीशी करून श्रीरामांचा प्रवास सुरू झाला. श्रीराम वनवासात चालले आहेत, याचे अयोध्यावासीयांना दुःख वाटत असले तरी श्रीरामांनी मात्र मागे एक वलय उत्पन्न करून ठेवले होते. पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांच्याकडे आकर्षित झालेल्या अयोध्येतील जनसमुदायाने पूर्ण अयोध्या हे आपलेच घर आहे, असे समजून निष्ठेने काम केले. सर्व जडसंग्रह हे नाशाचे साधन होय आणि जडसंग्रह मनुष्याला खाली ओढतो, त्याऐवजी ज्यात प्राणशक्ती आहे, जीव आहे, अशा जिवंत वनसंपदेमुळे मनुष्याचा उद्धार होऊ शकतो. वनात कुठल्याही लोभाला बळी न पडता, वनसंपदा हीच मनुष्याला तारणारी संपदा आहे, हे लक्षात घेऊन वनाचे संरक्षण केले, वनावर प्रेम केले, श्रीरामांनी वनात निवास केला. शबरीची बोरे खाऊन श्रीरामांनी एक वेगळ्या प्रकारची जाणीव करून दिलेली दिसते. वनसंपदा अगदी साधीसुधी असते. वनात वावरणारी श्वापदे, विविध पशुपक्षी आपापल्या स्वभावानुसार जगत असतात, स्वतःचे काही नियम पाळत असतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फसवेगिरी नसते. फसवेगिरी जर सुवर्णमृगाच्या रूपाने दिसायला लागली किंवा वनसंपदा बाजूला ठेवून सुवर्णाची लालसा उत्पन्न झाल्यास पुढे कशा तऱ्हेने वाटचाल होते, हे दाखवून श्रीरामांनी लोकशिक्षणाचा व सहज साध्या जीवनाचा पाठ घालून दिला. सहधर्मचारिणी या नात्याने सीता श्रीरामांच्या पावलांवर पाऊल टाकून कुठल्याही प्रकारच्या भोग-अपेक्षांचा विचार न करता श्रीरामांना साथ देत राहिली. अर्थात, असंख्य माणसेही श्रीरामांना येऊन मिळाली. त्यामुळे श्रीरामांना रावणासारख्या महाबलीचा वध करणे शक्य झाले.

अयोध्या हे ज्या नगरीचे नाव आहे, त्या नगरीमध्ये कुठल्याही प्रकारे तेथील जनतेला त्रास होईल, अशा हेतूने कुणाचाही प्रवेश होऊ शकत नाही. भारतवर्ष तेजोपासना करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रसिद्ध आहे. तेज म्हटले की सर्वांत प्रथम आठवण येते ती सूर्याची. सूर्योपासक, तेजोपासक, तेजःपुंज अशा सर्वांना आश्रय मिळावा म्हणून सूर्यवंशीयांनी वसविलेले शहर ते अयोध्या. मनूने विश्वाच्या निर्मितीचा आराखडा तयार केला. मन किंवा मनू ही एक संकल्पना आहे. जडाचे चिंतन करत असल्यामुळे मनाला जडामध्ये मोजले जात असले, तरी ते जडाच्या व्याख्येत बसत नाही. मनाला सूक्ष्मात धरणे अधिक योग्य होते. संगणकाच्या भाषेत बोलायचे झाले तर मन हा एक प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅममध्ये कुठल्याही व्हायरसला प्रवेश नाही. या प्रोग्रॅमने तयार केलेले जे चैतन्याचे शहर, त्या अयोध्येतही हस्तक्षेप करून व्यवस्था बिघडविण्याचा हेतू असलेल्या कोणालाही प्रवेश मिळत नाही. व्हायरसप्रूफ अशा या मनोसंकल्पनेने (प्रोग्रॅमने) तयार केलेली ही अयोध्यानगरी. जिच्यात युद्ध नाही, जी युद्धाने जिंकण्यासारखी नाही, अशी ही अयोध्या. बाहेरचा शत्रू आक्रमण करून आला, तरच युद्धप्रसंग येतो असे नाही. मनुष्याचे स्वतःशीही युद्ध होते. हे करू की ते करू, चांगल्या- वाइटाचा निर्णय कसा घ्यावा, अशा संभ्रमावर विजय मिळविण्यासाठी आवश्यकता असते विवेकाची, अंतःप्रेरणेची आणि दिव्यदृष्टीची. अशा प्रकारची सर्व योजना असलेली नगरी ती अयोध्या. या नगरीमधील माणसांचे एकमेकांशी भांडण नसे, द्वेष नसे, त्यांचे स्वतःचे स्वतःशी भांडण नसे. द्वापारयुगाची पूर्ण कल्पना प्रस्थापित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही अयोध्या. या अयोध्येतील सर्व रहिवाशांचे प्रतीक म्हणून राज्य करणारे प्रभू श्रीराम. 

शरीरातील दहा इंद्रियरूपी घोड्यांवर व रथावर ताबा मिळविणारा तो दशरथ. प्रतीकरूपाने बघायचे झाले तर अयोध्या व राम हे एकमेकांशी संतुलित असतात, शोभून दिसतात. शरीरातील चलनवलनाचे मार्ग एकमेकांशी कधीच काटकोनात येत नाहीत, तसे मनूने अयोध्या शहराची रचना करताना अयोध्येतील रस्ते सम अंतर ठेवून केलेले होते. रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथील चौकांत चौक्या करून शस्त्रास्त्रे ठेवलेली असत, जेणेकरून कोणीही आक्रमण करून अयोध्येत येऊ नये. मनुष्याने पण चेतासंस्थेवर व मणिपूरचक्र शक्तिकेंद्रावर लक्ष ठेवले तर संकटे येऊ शकणार नाहीत. अयोध्येतील घरे बारा महिने चोवीस तास उत्सवासारखी नटविलेली असत. नागरिकांच्या सुखसोयींसाठी नगरीत उपवने होती. नगरीत वनसाम्राज्य असून नगरीला वृक्षवेलींचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वातावरण होते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण वाढू नये, या हेतूने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लावलेले होते. विषारी जंतूंचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी ठिकठिकाणी यज्ञरूपाने अग्नी योजलेला असे. अयोध्येतील उपवनांत सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, एकमेकांच्या सामाजिक भेटीगाठी होत असत. अशा या अयोध्येत स्वच्छता 
अतिशय काटेकोरपणे पाळली गेली होती. तेथील घरे रंगवतांना वेगवेगळ्या रंगांची सोय केलेली होती. अर्थात त्यांच्यातून निघणारी स्पंदने अयोध्येचे रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरत असावीत.

अशा या अयोध्येमध्ये द्वापारयुग संपता संपता, पुढे कसे दिवस येऊ शकतील, राज्यकर्ते कुठल्या चुका करतील, याची चुणूक दिसावी म्हणून की काय, दशरथाने आपल्या तीन राण्यांपैकी एकाच राणीला वचन दिले. दशरथाला पुत्रप्राप्ती नसल्यामुळे पुढे राज्याचा गाडा कसा चालेल, याविषयी चिंता दशरथापेक्षा प्रजाजनांना अधिक होती. राजा जेव्हा लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतो, लोकांच्या अडचणींकडे लक्ष देतो, शहराचा विकास करताना लोकांच्या सोयींकडे लक्ष देतो, तेव्हा त्याचे दुःख त्याच्यापेक्षा राज्यातील लोकांना अधिक असते. याचा फायदा असा झाला, की अयोध्येला अधिपती पाहिजे, अयोध्येला राज्यकर्ता हवा, असे चिंतन अनेकांकडून केले गेले होते. या सर्व मानसिक शक्तीच्या स्पंदनांचा परिणाम होऊन अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. 

चौकात उभा केलेला पुतळा किंवा मंदिरात स्थापन केलेली मूर्ती काल्पनिक व्यक्तीची नसते, समाजासाठी व मनुष्यमात्रासाठी केलेल्या कार्याची आठवण म्हणून पुतळा उभा केलेला असतो. प्रभू श्रीरामांचे व त्यांना पूर्णपणे साथ देणारे लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे पुतळे रामराज्यानंतर त्या वेळीही उभे केलेले असावेत, त्यांच्यापासून लोकांनी प्रेरणा घेण्यासाठी रामजन्मोत्सव वगैरे साजरे केले जात असावेत, अशी माहिती उत्खननातून मिळालेल्या मूर्तीवरून, पुतळ्यांवरून व मंदिरांवरून आजही मिळते. चौदा वर्षे वनवासासाठी जाताना अयोध्या अजिंक्य आहे, तेव्हा राज्याची काळजी नाही, हे जाणून श्रीराम वनवासातही निश्र्चिंत होते. अशा तऱ्हेने श्रीरामांनी अयोध्यानगरीच्या पाठबळावर दुराचारी, हिंसा वाढवणाऱ्या रावणाचे पारिपत्य केले.  प्रत्येक कार्याला पाया मजबूत लागतो म्हणून अयोध्या. द्वापारयुगानंतर त्रेतायुग आले, नंतर कलियुग आले. या काळाच्या ओघात माणसाच्या स्वभावात काळेपणा, कपट, कारस्थान यांच्यात वाढ झाली. याची सुरुवात सामान्य धोब्याने सीतेच्या चारित्र्यावर घेतलेल्या आक्षेपाने झालेली दिसते. कपडे धुणाऱ्या धोब्याने कपड्यावर कुठे डाग आहे, हे पाहणे अपेक्षित आहे; पण त्याने रामपत्नी सीतेच्या चारित्र्यावरचा डाग शोधण्याचा प्रयत्न केला आणि येथूनच त्रेतायुगाची चाहूल लागली. भारतवर्षातील सर्व नागरिकांच्या मनातून आजही म्हणजे साधारण तेरा-चौदा हजार वर्षांनंतरही श्रीरामांची आठवण जाऊ शकत नाही. त्यांनी मनुष्यमात्रासाठी एवढे काम केले, की ते आमच्या गुणसूत्रांमध्ये उतरलेले आहे. 

श्रीरामांची आठवण मनातून जाणे शक्य नाही. अयोध्या ही श्रीरामांची भूमी. ज्या मातीतून श्रीरामांसारखा देवदूत प्रकट झाला, त्या मातीचेही काही महत्त्व आहेच. कलियुगात वाटचाल होत असताना जीवन असह्य झालेले दिसते, राज्यकर्ते, व्यवस्थापक, सामान्य जन वगैरे सर्वच चुकीच्या मार्गाने केवळ संपत्तीची लालसा धरू लागले आहेत, असे दिसते. अशा वेळी  पुन्हा एकदा अयोध्या त्याच दिमाखात उभी राहिली, तर एक मोठे कार्य होईल. ते भारतीय वंशाच्या सर्व लोकांना मार्गदर्शक ठरेल आणि पुन्हा एकदा शांती-आनंदपूर्ण असे जीवन सुरू होईल, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक असंतुलन असणार नाही, मनूने केलेल्या सुरुवातीच्या संकल्पनेत, प्रोग्रॅममध्ये घुसलेला व अंदाधुंदपणे फिरत असलेला व्हायरस नष्ट होईल. 

जय श्रीराम, जय अयोध्या.
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५
www.balajitambe.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com