

Amravati Lok Sabha 2004
esakal
प्रस्थापितांच्या विरोधात आक्रमक युवा कार्यकर्ता म्हणून माझा फोटो पेपरात छापून आला. त्या फोटोने प्रस्थापितांसमोर पर्याय उभा केला. सर्वांची एकच मागणी, ‘बच्चू, लोकसभा लढव.’ तेव्हा ‘अमरावती लोकसभेला उभे राहू नका’ असा धमकीवजा फोन आला. त्या एका वाक्याने निर्णय पक्का झाला आणि ठरलं, ‘लोकसभा निवडणूक एक आंदोलन म्हणून लढायची...’
कुठल्या राजकीय घराण्यातून आलेलो नाही. माझ्या हातात चांदीचा चमचा नव्हता. डोक्यावर कुणाचा वरदहस्त नव्हता. पाठीशी सत्तेची सावली नव्हती. आमचं जगणं रस्त्यावरचं होतं. आंदोलन आमचं विद्यापीठ होतं. जनसामान्यांसाठी आंदोलनातून संघर्ष हा आमचा रोजचा अनुभव होता... ही गोष्ट आहे, ‘अमरावती लोकसभा २००४’ची. ही गोष्ट आहे, अशा लढ्याची ज्यात पैसा नव्हता, सत्ता नव्हती, मोठा पक्ष नव्हता; पण जिवाभावाचे सहकारी, प्रामाणिक कार्यकर्ते आणि जीव ओवाळून टाकणारे लोक होते. ही गोष्ट आहे, लोकशाही कागदावर नाही; तर रस्त्यावर कशी लढली जाते, याची.