
‘माझं नाव ओमप्रकाश... पण नावात काय ठेवलंय यारो? आम्ही नावासाठी नाही, कामासाठी ओळखले जातो. म्हणूनच माझं नाव बच्चू - आणि तेही सगळ्यांच्या मायेने, आपुलकीने पडलेलं लहानपण म्हणजे खेळ, उधळण, प्रेम, मस्ती आणि... उपद्व्याप! आमचं घर होतं - सामान्य शेतकऱ्याचं. गुराढोरांचं राज्य. मी घरातला सगळ्यात लहान. आई फार आवडीने माझे केस मोठे असल्यामुळे बुच्ची घालून द्यायची, आंघोळ करून टिका लावून बुच्ची घातली आणि गडवाभर दूध प्यायलो की सावजी काकांच्या खांद्यावर बसून माझी स्वारी पूर्ण गावातून चक्कर मारून येत होती. तेव्हा नर्सरी-केजी वन हा काही प्रकार नसल्यामुळे सहा वर्षांपर्यंत शाळेची काही भानगडच नव्हती. नंतर पहिली ते चौथीपर्यंत आनंद प्रायमरी या शाळेत चांदूर बाजारला जायला लागलो, पुढे पाचवीपासून (उच्च शिक्षणाकरिता) अमरावतीच्या प्रगती विद्यालयामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायसाठी आलो; पण शाळा आणि अभ्यास हा विषय कधीच गांभीर्याने घेण्याचा स्वभावच नव्हता.
त्या शाळेत जो विषय कठीण वाटायचा त्याचे सर वर्गात येण्याआधी आम्ही काही मित्र बेंचच्या खाली बसून जायचो. खाली बसून ताराच्या आकोड्यान सर्व मुलांनी पायातून काढून ठेवलेले चप्पल-जोडे बेंचच्या खाली बसून ओढून जमा करून घ्यायचो. त्यासाठी बऱ्याचदा सरांचा मार खाल्ला. गावात उन्हाळ्यामध्ये त्यावेळी कुलर-एसी नव्हते. मोहल्ल्यातील मंडळी बाहेर गल्लीवर खाटा टाकून झोपायची. ते गाढ झोपले, असं पाहिलं की त्यातील एक-दोघांच्या बाजा आम्ही उचलून गोठानावर (गावठाणावर) नेऊन ठेवायचो आणि त्यांना जाग आल्यावर किंवा सकाळी ते उठल्यावर त्यांच्या चिडण्याची गंमत पाहायचो. थोडं थोडं मोठं व्हायला लागलं तेव्हा घरी गाई-म्हशी भरपूर होत्या. आई मला ताक विकायला गावात पाठवायची. मग गावात ताकाची बकेट घेऊन ताक विकण्यासाठी जायचो. एकदा गावातील माझे मित्र गुना व शरद यांच्यासोबत एक गंमत केली.