
Bacchu Kadu Story
esakal
‘घरपोच सातबारा’ अशी घोषणा युती सरकारने केली होती; पण ती फक्त कागदावरच राहिली. मी पंचायत समिती सभापती म्हणून थेट बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलं. ‘साहेब, शेतकऱ्याचा चुकारा २४ तासांत मिळावा आणि त्याच्या पैशावर एकही कपात होऊ नये.’ त्या पत्रावरून राज्यभर चर्चा झाली. लोक म्हणू लागले ‘बच्चू बोलत नाही, थेट लढतो!’ आणि मग आली ती ‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली हाक!’
त्या काळात पंचायत समितीचं दालन म्हणजे मोठ्या लोकांचं घर. साधा माणूस तिकडे पाय ठेवेल ही कल्पनाच लोकांच्या मनात नव्हती. बाहेर बसलेला कारकून वरून खाली बघायचा आणि आतल्या दालनात जाण्याचा अधिकार फक्त निवडक लोकांनाच होता. पण मी सभापती झालो आणि छोटू भाऊ देशमुख उपसभापती झाले तेव्हाच आम्ही पहिल्याच दिवशी ठरवलं, ‘ही केबिन आता सर्वांसाठी खुली राहील!’ शेतकरी असो, कार्यकर्ता असो किंवा एखादा गरजवंत सामान्य नागरिक, जो कोणी या दालनात यायचा त्याला तिथे आपलेपणाची जाणीव व्हायची. सभापतीच्या केबिनमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी चहा-पाण्याची साधी; पण मनापासून व्यवस्था असायची. लोक म्हणायचे, ‘सभापतींच्या दालनात गेलं, की आपल्याला आपलं माणूस भेटतं.’