
आता २०२५ वर्षात दहा वर्षं जुन्या ‘बेंगलोर डेज’ (२०१४) या फिल्मवर चर्चा का करावी, हा प्रश्न अगदी रास्त आहे; पण २०२४ मध्ये संपूर्ण देशातील सर्व भाषांमधील सिनेमा उद्योगाची अवस्था (हो तमिळ आणि तेलुगूसुद्धा) फार बरी नसताना एकटा मल्याळम चित्रपट उद्योग इतकी भरभराट कशी दाखवतो, याची पाळंमुळं शोधताना त्याच्या वाढीतील ‘बेंगलोर डेज’ हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो; नवीन शतकात बदलणाऱ्या समाजासोबत बदलणारा सिनेमा म्हणून तो पुढे येतो म्हणूनच आज त्यावर थोडासा प्रकाश...
मल्याळम सिनेमाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील नवनवीन कथनशैली आत्मसात करताना हे लेखक-दिग्दर्शक त्याला केरळच्या भूमीशी मात्र कायम जोडलेलं ठेवतात. मल्याळम समाजात आज काय घडतं आहे त्याचं प्रतिनिधित्व तिथल्या सिनेमात दिसतं आणि याचा अर्थ तो सिनेमा प्रवचनी स्वरूपाचा आहे किंवा मेसेज की मनोरंजन, या वादात पडतो. तर तसंही अजिबात होताना दिसत नाही. मुळात त्यांचे सिनेमे कथाप्रधान आहेत. वरील सगळे मुद्दे त्याच्यात समाविष्ट असतानादेखील तो कथेला सर्वाधिक महत्त्व देताना दिसतो. म्हणून तर कदाचित थ्रिलर आणि मल्याळम सिनेमा यांच्या नात्यावर अनेक विनोदसुद्धा केले जातात.