

Bangladesh minority violence Hindus 2024
sakal
विनय सहस्रबुद्धे - माजी खासदार
बांगलादेशातील ‘ मुक्ती-संग्राम सैनिकांच्या वारसांना’ दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात सुमारे दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या आंदोलनाने पाच ऑगस्ट २०२४ या दिवशी पाहता पाहता अतिशय विकृत वळण घेतले. त्यानंतरचा सर्वच घटनाक्रम बांगलादेश-हितैषींची चिंता वाढविणारा आहे.
शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ ची -पहाट ! बांगलादेशातील राजबारी नावाच्या एका जेमतेम लाखभर वस्तीच्या शहरात रीपन साहा नावाचा एक बंगाली -हिंदू तरुण ‘करीम फिलिंग स्टेशन’ नावाच्या पेट्रोलपंपावर काम करायचा. त्या दिवशीही रोजच्या शिरस्त्यानुसार पहाटे निमूटपणे आपले काम करण्यात तो निमग्न होता. रीपनचे काम ग्राहकांच्या वाहनांत पेट्रोल भरणे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करणे हे होते. बिलाच्या वसुलीत काही कमी- अधिक झाले तर जबाबदारी त्याचीच असायची आणि पैसे वसूल न झाल्याचा भुर्दंड त्यालाच पडायचा. त्यामुळेच त्या दिवशी सकाळी बांगलादेशात सध्या ज्या राजकीय पक्षाचा जोर आहे त्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चा नेता अबुल हाशेम काळ्या रंगाच्या लँड क्रूझरमधून आला आणि वाहनात भरल्या गेलेल्या पेट्रोलचे बिल न देताच निघून जाऊ लागला. रीपन ने हटकल्यानंतर झालेल्या वादावादीच्या दरम्यान तो हिंदू आहे हे ध्यानात येताच वाहनचालकाने त्याच्यावर आपले वाहन घातले आणि त्यात रीपन चिरडला जाऊन प्राणांतिक जखमांमुळे अखेर मृत्यू पावला. रीपनच्या हत्येनंतर अवघ्या आठ दिवसात, २५ जानेवारीस ढाका -सिल्हट रस्त्यावर असलेल्या नरसिंगडी या जिल्ह्याच्या ठिकाणी चंचलचंद्र भौमिक या मोटार मेकॅनिक तरुणाची तो आपल्या वर्कशॉपमध्ये झोपला असताना त्याच्या वर्कशॉपलाच बाहेरून आग लावून देवून निर्घृण हत्या करण्यात आली. निरपराध चंचलच्या आर्त किंकाळ्या आणि आक्रोश सुरूच होता; पण इस्लामी कट्टरतावादी तरुणाच्या गटाची दहशत एवढी की त्याला वाचवू इच्छिणारे त्याचे मित्र आणि परिचितही पुढे येऊ धजावले नाहीत. अर्थात या घटना अपवादात्मक म्हणता येणार नाहीत. डिसेंबर२०२५ मध्ये मैमनसिंग या शहरातील दिपू चंद्र दासची हत्या त्यावेळी बरीच गाजली होती. आधी मारपिट करून बेशुद्ध केल्यानंतर त्याला विवस्त्र करून, झाडाला उलटे टांगून खालून आग लावून जाळून खाक केले गेले होते. अनेक विकृत कट्टरपंथीय तरुण नाचत- नाचत या हिंसक प्रकाराचा आनंद घेत होते असे ‘ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’च्या विस्तृत बातमीत म्हटले होते.