सावधान, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंचा होऊ शकतो गैरवापर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

your photos on Facebook, Instagram can be misused}
सावधान, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंचा होऊ शकतो गैरवापर !

सावधान, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंचा होऊ शकतो गैरवापर !

"बुलीबाई ऍप' नावाच्या ऍपवर ठराविक धर्मातील प्रतिष्ठीत महिलांचे छायाचित्रे वापरुन त्या महिलांचा लिलाव करण्याचा घृणास्पद प्रकार मुंबई पोलिसांनी अक्षरशः हाणून पाडला. महिलांबाबत घडलेला हा पहिलाच प्रकार नाही, तर महिलांची सोशल मीडियावरील छायाचित्रे, व्हिडीओ चोरुन, त्यांचा परस्पर वापर करुन बदनामी किंवा अन्य गैरप्रकार करण्याच्या घटना सातत्याने घडतात. अशा घटना रोखण्यासाठी सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते, मात्र महिलांनीही समाजमाध्यमांवर स्वतःची खासगी छायाचित्रे, व्हिडीओ शेअर करताना आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, महिलांबाबत समाजमाध्यमांवर नेमका कसा गैरप्रकार होतो, कोण करते आणि त्यापासुन सुरक्षित राहण्यासाठी नेमके काय करावे, यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

इंटरनेटमुळे जग "ग्लोबल' झाले हे नक्की खरे आहे. मात्र या "ग्लोबल' जगामध्ये म्हणजेच आभासी (व्हर्च्युअल) जगामध्ये वावरताना आपण आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाऊन कोणी तरी आपल्याकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओचा गैरवापर तर करीत नाही ना, ना हा प्रश्‍न कधीतरी आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण घटनाही तशीच घडली.

अवघ्या 16 वर्षाची नयनाची (नाव बदललेले आहे) फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. नयना धाडसी स्वभावाची असल्याने, वेगवेगळ्या पोझमधील छायाचित्रे काढण्याची तिला भारी आवड असल्याने ती अशी छायाचित्रे काढून ती फेसबुकवर तत्काळ अपलोड करीत होती. त्यातुनच एका अनोळखी व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, तिनेही ती स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. हळूहळू त्याने तिची फेसबुकवरील छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिची छायाचित्रे मॉर्फींग करुन त्यांना अश्‍लिल छायाचित्रांशी जोडले. त्यानंतर त्याने तिला ती छायाचित्रे पाठवून, ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. तिनेही घाबरुन सुरुवातीला त्याला काही पैसे दिले. त्यानंतर सातत्याने हा प्रकार घडू लागल्याने तिने पोलिसांना हा प्रकार सांगितला. नंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा: विंटर सिझनमध्ये करा सागरी सफर!

महिला, विशेषतः तरुणी त्यांचे फोटो, व्हिडीओ, अन्य खासगी माहिती फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर तत्काळ टाकतात. त्याला त्यांच्या ग्रुपमधील लोकांकडून वाहवा मिळते. इथपर्यंत ठिक आहे. परंतु याच फोटो, व्हिडीओचा बनावट फेसबुक अकाऊंटकर्त्यांकडून, सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर करुन महिला, तरुणींना त्रास देणे, त्यांना बदनामीची भिती दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळणे किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे असे प्रकार घडतात. हे केवळ मोठ्या शहरांमध्येच घडते असे नाही, तर आता ग्रामीण भागामध्येही हे लोण पसरले आहे. त्याचा सर्वाधिक फटका महिला, तरुणींना बसतो आहे. हे गैरप्रकार थांबण्यासाठी आता खबरदारी आणि काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी सोशल मीडियावर आपण टाकत असलेले खासगी फोटो, व्हिडीओ यांना आता आवर घालण्याची गरज आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून मिळणारा "लाईक', "स्माईली' सारख्या इमोजींमुळे आपल्याला क्षणभर मोठा आनंद मिळेलही, मात्र त्यामुळे होणारा गैरप्रकार आणि पुढे होणारा मानसिक, शारिरीक त्रासही तितक्‍याच मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी तरुणी, महिलांना आपल्या मनावर, भावनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवावी लागणार आहे.

फोटो, व्हिडीओचा डेटींग साईटपासून एस्कॉर्ट सर्व्हिसपर्यंत होऊ शकतो गैरवापर
काही सायबर गुन्हेगार हे बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे इतरांचे फोटो, वैयक्तीक माहिती चोरुन त्याचा गैरवापर करण्याची दाट शक्‍यता असते. तसेच एकतर्फी प्रेमातुन किंवा वैयक्तीक आकसापोटीदेखील असे प्रकार केले जाऊ शकतात. त्यातुन चोरलेले फोटो, व्हिडीओ विवाहासंबंधीची संकेतस्थळे, ऍप, डेटींग ऍपवर वापर केला जाऊ शकतो. हे प्रकरण केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहात नाही, तर अनेकदा एकमेकांविषयी असलेल्या रागातुन किंवा खंडणी उकळण्याच्या उद्देशातुन महिला, तरुणींचे फोटो, व्हिडीओ मॉर्फींग करुन, एडीट करून त्यांचा वापर थेट अश्‍लिल व्हिडीओ, एस्कॉर्ट सर्व्हिससाठी करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकारही घडतात. त्यातुनच पुढे महिला, तरुणींना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियाचा सुरक्षितपणे वापर करतानाच आपले खासगी फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकताना आपला हात अखडता घेण्याशिवाय आता पर्याय नाही.

पुण्यात मागील वर्षी मोबाईलसंबंधी 374 तक्रारी आल्या आहे, तर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा समाजमाध्यमांद्वारे झालेल्या फसवणुकीच्या तीन हजारांपेक्षा जास्त घटना घडलेल्या आहेत. डेटा चोरीच्या 59, हॅकींगच्या 215 घटना घडल्या आहेत. या घटनांवरुनच सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती शेअर केल्यामुळे पुढे घडलेले प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून फोटो, व्हिडीओ चोरुन त्याचा गैरवापर करणे किंवा ओळख वाढवून त्यांच्याकडून संबंधित महिला, तरुणी किंवा अल्पवयीन मुले-मुली यांच्याकडून फोटो, व्हिडीओ घेऊन गैरप्रकार केले जातात. अनेकदा "न्युड कॉल' द्वारेही महिला, तरुणी किंवा अल्पवयीन मुलींचे व्हिडीओ घेऊन त्यांना फसविण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी महिला, तरुणींसह पालकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

""महिला, तरुणींचे प्रोफाईलवर इतरांना सहज उपलब्ध होतात. त्यातुन गैरप्रकार होतात. अनेकदा तेथील फोटो घेऊन ते मॉर्फींग करुन किंवा एडीट करून त्यांचा वापर डेटींग साईटस्‌ एस्कॉर्ट सर्व्हिस सारख्या प्रकारांसाठी होतो. कधी एकतर्फी प्रेमातुन तर कधी जाणीवपुर्वक त्रास देणे, पैसे घेण्याच्या कारणावरुन महिला, तरुणींना ब्लॅकमेल करुन असे प्रकार केले जाऊ शकतात. त्यामुळे महिला, तरुणींनी सोशल मीडियावर आपले फोटो ठेवताना आवश्‍यक काळजी घेतली पाहीजे.''

-डी.एस.हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर पोलिस.

हेही वाचा: महापालिका निवडणूक पुढे ढकलणे कोणाच्या पथ्यावर?


अशी घ्या काळजी

- आपले प्रोफाईल, फोटो, व्हिडीओ इतरांना सहज उपलब्ध होतील दिसेल असे ठेवू नये
- फोटो शेअर करण्यापुर्वी सोशल मीडियावरील पर्यायांचा विचार करावा
- मोबाइलचे "स्क्रिन लॉक' करायला विसरु नये
- मोबाइल बॅंकिंगवेळी "स्क्रिन अनलॉक'च्या पर्यायाचा वापरा करावा
- बॅंकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये जतन करुन ठेवू नये
- मोबाईलचा पासवर्ड सतत बदलत रहावा
- मोबाईल पासवर्डमध्ये अक्षरे, अकड्यांचा वापर करावा
- सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट वापरल्यास "ब्राऊजिंग हिस्ट्री' तत्काळ काढून टाकावी
- अनोळखी व्यक्तींशी चॅटींग करताना वैयक्तीक माहिती देण्याचे टाळावे
- कॅमेऱ्यासंबंधी काम पुर्ण झाल्यावर मोबाईलचा वेब कॅमेरा बंद करावा
- स्वतःची किंवा कुटुंबाची गोपनीय माहिती समाजामध्यमांवर ठेवू नका
- अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्या
- कोणत्याही प्रकारचे "क्‍युआर कोड' स्कॅन करू नका
- बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती इतरांना देऊ नका
- परिचीत नसलेल्यांशी व्हॉटसअप कॉलींगद्वारे संवाद साधू नका
- चुकीचे घडत असल्यास कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रीणी किंवा पोलिसांशी संवाद साधा

हेही वाचा: फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!

म्हणुन हा प्रकार ठरेल सायबर गुन्हा !

अश्‍लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या 292 कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याअंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम 66 हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल 66 (ए) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. "आयडेंटिटी थेफ्ट', "वैयक्तिक संवेदनशील माहिती' चोरी व गैरवापर केल्याबद्दल 66(सी) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते. "प्रायव्हसी'च्या उल्लंघनाबद्दल 66(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल 67(ए) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ शकते.

फसवणुक झाल्यास किंवा टाळण्यासाठी इथे साधा संपर्क -


* सायबर पोलिस व्हॉटस्‌अप क्रमांक - 7058719371, 7058719375
* सायबर पोलिस ठाणे - 020-29710097
* ई-मेल - crimecyber.pune@nic.in

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top