
मा णूस चार पायांवरून दोन पायांवर आला याचा त्याला झालेला सगळ्यात मोठा फायदा कोणता होता? तर, त्याचे दोन हात मोकळे होऊन त्या हातांना स्वतंत्र कार्य मिळालं, त्यांची पकड तयार झाली! यामुळे माणूस वस्तू पकडायला, उचलायला, फेकायला शिकला... भलं झालं! माणसाची पकड विकसित होऊन त्याचे पंजे मुठीप्रमाणे काम करायला लागले या उत्क्रांतीच्या महत्त्वाच्या बदलाचे साक्षीदार होते.
‘भाला’ हे माणसाने तयार केलेलं पहिलं विकसित शस्त्र! भाल्याने त्याच्या पूर्वजांना झाडाच्या ओबडधोबड फांद्यांपासून माणसाने बनवताना, दगडी हत्यारं बनवायला लागल्यावर दगडी टोकं फांद्यांना वेलीने गुंडाळताना, धातूयुगात सुबक टोक कोरीव दंडावर बसवताना अशा अनेक स्थित्यंतरांमधून जाताना बघितलं, पण या सगळ्यामध्ये त्याचं सरळ, उभा दंड आणि त्यावर बसवलेलं पातं हे स्वरूप मात्र कुठल्याही कालखंडात बदललं नाही.
भारतामध्ये ‘भाला’ शस्त्रासाठी फार अर्थपूर्ण संज्ञा (विशेषतः संस्कृतमध्ये) पूर्वापार वापरल्या गेल्या आहेत. ‘विशिख’ म्हणजे ‘लोखंडी टोक असलेला बाण’, भाल्याएवढं लांबीने मोठं शस्त्र दुसरं नाही, म्हणून ‘दीर्घायुध’, भाला फेकून लांबवरच्या लक्ष्याचा वेध घेता येतो, म्हणून ‘दूरवेधी’, सुरूवातीच्या काळात भाल्यांना दगडी पाती लावली जायची, त्यावरून ‘पाषाणी’ अशा अनेक कार्य आणि रचनादर्शी संज्ञा आपल्याला दिसून येतात. सुरूवातीच्या लेखामध्ये शस्त्रांचे ‘मुक्त’, ‘अमुक्त’ आणि ‘मुक्तामुक्त’ म्हणजे फेकली जाणारी, हातात धरून चालवली जाणारी आणि फेकून परत घेता येणारी या वर्गांचा उल्लेख मी केला होता. भारतीय शस्त्रांमधलं ‘भाला’ हे एकमेव असं शस्त्र आहे जे या तीनही वर्गांमध्ये चालवलं जावू शकतं! भारतीय भाल्यांच्या वैविध्यामध्ये फेकून मारण्याचे, हातात धरून चालवायचे आणि फेकून परत घेता येणारे असे तिन्ही प्रकार आढळून येतात.