
भूषण ओक
भारतात २२ मान्यताप्राप्त भाषा आणि शेकडो बोलीभाषा आहेत. या सर्व भाषांना भाषांतराच्या एका सूत्रात बांधणे ही कल्पनाच भव्य आहे. ‘आयआयटी, मद्रास’ या शैक्षणिक संस्थेने हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला आहे.
कृत्रिम प्रज्ञा ( एआय) हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. सगळ्या गोष्टी ‘एआय’द्वारे साध्य होतात, अशी समजूत झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कठीण वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरं सहज देऊ शकते. विश्वातील माहिती धुंडाळून एखाद्या जटिल प्रश्नाचे उत्तर ती काही सेकंदांतच देते. एखाद्या विषयावर कवितेच्या काही सुंदर ओळी ती सुचवू शकते. एखादे सुंदर चित्र ती तुमच्या कल्पनेनुसार रेखाटू शकते. संगणकाचे ‘प्रोग्राम’ लिहू शकते, स्वयंचलित गाड्या चालवू शकते आणि आणखीही अनेक कामे चुटकीसरशी करू शकते.