

Bihar Hijab Case
esakal
बिहारमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाला आता धर्मांधतेचा रंग चढू लागला आहे. या संपूर्ण प्रकरणाला हिंदू व मुस्लिम असा रंग देण्याचा तयारीही जोरदारपणे सुरू आहे. एखादी बाजू या प्रकरणात आक्रमकपणे मांडत असताना दुसरी बाजू तिला विरूद्ध दिशेने ओढू लागली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यापासून पाकिस्तानातून आलेल्या धमकीने या प्रकरणाच्या निमित्त नितीशकुमार सरकारची अग्निपरीक्षाही होत आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा विषय ताणण्यात सत्ताधारी जनता दलापेक्षा भारतीय जनता पक्षानेच आघाडी घेतली आहे.
आपल्या संतुलित आचरणाबद्दल ओळख असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हातून असा प्रकार झाल्याने त्यांच्या मानसिक अवस्थेविषयीची चर्चा पुन्हा जोर पकडू लागली आहे. खरे पाहता १५ डिसेंबर रोजी बिहार राज्यातील आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात नुसरत परवीन या नावाच्या महिला डॉक्टरलाही हे प्रमाणपत्र प्रदान करायचे होते. त्यासाठी नाव पुकारल्यानंतर ज्यावेळी नुसरत व्यासपीठावर पोहोचली त्यावेळी नियुक्तीपत्र देणारे नितीशकुमार यांनी तिचा हिजाब हटवला व म्हणाले की ‘हे काय आहे?’ नितीशकुमार यांच्या बाजूलाच उभे असलेल्या उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांचा हात पकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत नुसरत हिच्या चेहऱ्यावरील हिजाब निघाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बाजूला आरोग्यमंत्री मंगल पांडे व मुख्यमंत्र्यांचे सहायक व निवृत्त आयएएस अधिकारी दीपककुमारसुद्धा उभे होते. यावेळी ते दोघेही या प्रकरणानंतर हसत होते. दोघांनीही मुख्यमंत्र्यांना असे करण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही व ते स्वतःवर संयमही ठेवू शकले नाहीत.