कल्याणी शंकर
वर्षभराने होत असलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे वेध आता या राज्यातील राजकीय वर्तुळाला लागले आहेत. नुकतीच भाजप आणि अण्णा द्रमुक यांनी पुन्हा युती केल्याची घोषणा केली. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, त्यात यश मिळविण्यासाठीच हा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतला आहे, हे स्पष्टच आहे. अण्णा द्रमुक हा पक्ष राज्यस्तरावरच नव्हे तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटकपक्ष झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही भाजपला त्याचा फायदा होणार आहे. त्या विषयी...
तमिळनाडू विधानसभा निवडणुका वर्षभराने होणार आहेत. त्यामुळे त्याचे पडघम ऐकू येऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुकची पुन्हा युती झाल्याने या निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांत नव्याने झालेल्या युतीची घोषणा या राज्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या युतीमुळे अण्णा द्रमुक पुन्हा देश पातळीवरील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष झाला आहे. त्यामुळे ही युती आगामी निवडणुकांत दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे राज्यसभेत पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत येण्यास मदत होणार आहे.