

AI Failures and Risks
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या अपयशाची अंगावर काटा आणणारी काही उदाहरणे समोर आली आहेत. चुकांमुळे निष्पापांचे प्राण गेले आहेत, बड्या कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे आणि समाजासमोर मानसिक आरोग्याचे एक अत्यंत गंभीर संकट उभे राहिले आहे. एआय वापरताना मानवी देखरेख, काटेकोर नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आणि जबाबदारीची प्रबळ भावना असणे अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) हा परवलीचा शब्द आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी घट्ट घर करून बसला आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत आपण नकळत या तंत्रज्ञानावर अवलंबून राहू लागलो आहोत. पण ते खरोखरच किती सामर्थ्यवान आहे? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते किती धोकादायक असू शकते? अलीकडच्या काळात या तंत्रज्ञानाच्या अपयशाची काही अत्यंत धडक आणि अंगावर काटा आणणारी उदाहरणे समोर आली आहेत. या चुका केवळ तांत्रिक स्वरूपाच्या नाहीत; तर त्यामुळे निष्पापांचे प्राण गेले आहेत, निर्दोषांना विनाकारण तुरुंगाची हवा खावी लागली आहे, बड्या कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे आणि समाजासमोर मानसिक आरोग्याचे एक अत्यंत गंभीर संकट उभे राहिले आहे. या सर्व भयावह पार्श्वभूमीवर एआयवर आपण ठेवत असलेल्या आंधळ्या विश्वासावर आणि अंधश्रद्धेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणे अत्यंत अपेक्षित अन् गरजेचे आहे.