
पर्ल हार्बरवर ७ डिसेंबर १९४१ या दिवशी हल्ला झाला आणि पुढील लक्ष्य कलकत्ता आहे, अशी हूल उठली. त्यानंतर देशावर भयाचे सावट पसरले. कलकत्त्यातील चित्रपटसृष्टी अस्वस्थ झाली. भारताच्या स्वातंत्र्याची चाहूल हुलकावणी देऊ लागली. सामान्य जनता मात्र रेशनच्या रांगा, तुटवडा, ब्लॅक आऊट, गोऱ्या सोजिऱ्यांची दहशत यात होती. तरीही भारतीय सिनेमा उमलत होता. स्वप्न साद घालत होती. त्या काळच्या काही घटना हेच सांगतात.
पृथ्वीराज म्हणजे पापाजी यांच्या पृथ्वी थिएटर्सला सर्वकाही मदत करणाऱ्या राजचा एक पाय सिनेमाच्या अंगणात होता. त्यानं केदार शर्मांकडून घेतलेल्या सिनेमा कलेला आता सर्वस्व द्यायचे जणू ठरवले होते. ईस्टर्न स्टुडिओ वरळी आणि एका ओपन सेकंडहँड गाडीत बसून राजची तयारी सुरू होती.
विषय जरा धाडस करून निवडलेला होता. अर्धवट जळलेल्या चेहऱ्याचा नायक केवल खन्ना स्वतः राज झाले. निम्मी नावाची त्याची वधू नर्गिस तर निर्मला झाल्या कामिनी कौशल. गाणी लिहिण्यासाठी बडे शायर बेहजाद लखनवी आले. संगीत राम गांगुली. शैलेश म्हणून एक युवा गायक, मुकेश, शमशाद गायला होते.