
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त)
युद्धांच्या इतिहासात डोकावलं, तर जाणवतं की, काही लढाया दीर्घकाळ चालतात ज्यात प्रेरणा टिकवून ठेवत चिवटपणे लढा देण्यात सैन्याचा कस लागतो. मात्र, कधी कधी अत्यल्प क्षणांची लढतही विजयाची मुहूर्तमेढ रोवून जाते! त्यामागे असलेली अचूकता, चातुर्य, नेमकेपणाच जणू मूर्तिमंत रूप घेतो आणि क्षणार्धात चित्र पालटतं! अवघी तीन मिनिटं ..! होय! अशीच एक लढाई अवघ्या तीन मिनिटांची होती, पण तिचा परिणाम मात्र खूप मोठा झाला. भारत-पाकिस्तान युद्धातली एक रोमांचक लढाई म्हणजे बोयराची लढाई! २२ नोव्हेंबर रोजी झालेली ही लढाई म्हणजे १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तान ह्या दोन्ही हवाई दलांमध्ये झालेली पहिली प्रत्यक्ष चकमक होती. याशिवाय भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा अद्वितीय समन्वय या लढाईत दिसून आला. या लढाईचे नायक- हवाई दलाचे तरुण अधिकारी इतिहासात ‘बोयरा बॉइज’ म्हणून प्रसिद्ध झाले.
हिंसेने, क्रौर्याने पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) पेटला होता. प्रचंड दडपशाही सुरू होती. पाकिस्तानच्या ‘सर्चलाईट’ या मोहिमेअंतर्गत पूर्व पाकिस्तानात विरोध करणाऱ्यांना शोधून संपवणं सुरू होतं. तणाव प्रचंड वाढला होता. भारताचा निर्णय ठाम होता आणि त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत भारताने सज्जता सिद्ध केली होती. बोयरा- कोलकाताच्या ईशान्येला साधारण १०० किलोमीटर अंतरावर असलेली सीमा. त्याच्याजवळ गरीबपूर हे भारताकडून जशोरच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरचं मोक्याचं ठिकाण! दोन्ही राष्ट्रांसाठी महत्त्वाचं असं हे ठिकाण होतं. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणं आवश्यक होतं. ‘मुक्ती वाहिनी’ हा लढणारा स्थानिक गट आणि भारतीय सैन्य यांच्या युतीला ‘मित्रो वाहिनी’ असं नाव देण्यात आलं. एकेक युद्धयोजना आकार घेऊ लागल्या होत्या.