
ब्रिक्स (BRICS) संघटना सध्या आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरत आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांवर १० टक्के अतिरिक्त कर लादण्याचा इशारा दिलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणामुळे त्यांची बहुपक्षीय संघटनांविषयी असलेली उदासीनता सर्वश्रुत आहे. ट्रम्प यांचा दृष्टिकोन अमेरिका-केंद्रित असून, त्यांनी यापूर्वीही जागतिक संस्थांच्या आर्थिक मदतीत कपात केली होती. ट्रम्प सरकारने आतापर्यंत १४ देशांना नव्या अतिरिक्त करासंदर्भात पत्र पाठवल्याची चर्चा आहे. त्यात आता ब्रिक्स संघटनेला देखील त्यांनी लक्ष्य केलेले आहे. याच कारणामुळे ब्रिक्स गटाचा जागतिक मंचावर वाढणारा प्रभाव हा अमेरिकाविरोधी आहे असे ते ट्रम्प मानतात. आणि या सर्व कारणांमुळे ब्रिक्स ही संघटना परत एकदा चर्चेत आली आहे.
उगम आणि वैशिष्ट्ये
ब्रिक्स ही एक बहुपक्षीय संघटना आहे. २००६ मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन या चार विकसनशील राष्ट्रांनी तिची स्थापन केली होती. या संघटनेचे नाव ब्रिक (BRIC) असे होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यावर ब्रिक्स (BRICS) असे नामांतर झाले. या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विकसनशील देशांमधील सहकार्य वाढवणे, बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेमध्ये बदल घडवणे आणि नव्या जागतिक आर्थिक संरचना उभ्या करणे. जागतिक जीडीपीत ब्रिक्सचा वाटा सुमारे ३०% आहे तर जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ४०% लोक येथे राहतात. हे आकडे ब्रिक्स संघटनेचे जागतिक महत्त्व स्पष्ट करतात.