

Business Management and Leadership
esakal
चकोर गांधी - chakorgandhi@gmail.com
मालकाला प्रश्न कोण विचारतं, या प्रश्नात व्यवसायाचे मूळ दडलेले आहे. हा प्रश्नच विचार करायला लावणारा आहे. त्याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मालक हा मालक असतो आणि त्याला वाटते, की आपण जे करतो ते सर्व बरोबरच आहे. आपण करतो तीच पूर्व दिशा, अशी त्याची धारणा असते. परंतु, प्रत्यक्षात सत्य तसे नसते. अनेक वेळा मालकाला योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले असते, तर अनेक व्यवसाय वाचले असते.
बहुतेक व्यवसायांमध्ये मालकाला प्रश्न विचारणारी यंत्रणा नसते. काही व्यवसायांमध्ये मालकाला प्रश्न विचारले जातात; परंतु, त्यांची व्याप्ती मर्यादित असते. कर्मचारी किंवा कामगार प्रश्न विचारू शकतात. कामगार संघटनांच्या माध्यमातूनही प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु, हे प्रश्न प्रामुख्याने त्यांच्या कामाशी संबंधित आणि त्यांच्या हिताचे असतात. अनेक वेळा मालक चुकीचे निर्णय घेत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते; परंतु, नोकरी टिकवण्याच्या आणि काम सुरू राहण्याच्या चिंतेपोटी ते प्रश्न विचारत नाहीत. त्यांना तसे करण्याची भीती वाटते. मालकाला काय वाटेल, या विचाराने कर्मचारी प्रश्न विचारणे टाळतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यवसायात मोकळेपणाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणूनच मालकाने कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा योग्य अर्थ समजून घेऊन त्यावर विचार करणे गरजेचे आहे.