Can Artificial Intelligence Help Find Alien Intelligence
Can Artificial Intelligence Help Find Alien Intelligence

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून परग्रहवासीयांचा शोध घेता येईल?

विश्‍वाच्या अथांग पसाऱ्यात अन्‌ गूढ अशा गहन पोकळीत आपल्या पृथ्वीसारखाच बुद्धिमान जीव विश्‍वात अन्यत्र असेल का, हा प्रश्‍न मानवाला अजूनही पडलेला आहे. ही झपुर्झा यात्रा अजून किती तरी शतके पुढे जाणार आहे. अजून तरी विश्‍वाच्या अन्य कोपऱ्यातून परग्रहवासी आहेत की नाहीत, या प्रश्‍नाचे उत्तर मानवाला अजूनही सापडलेले नाही. परग्रहवासीयांचा संपर्कही अजून तरी झालेला नाही. ते कसे आहेत, ते कोणत्या भाषेत बोलतात, असे अनेकानेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. अशावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) माध्यमातून आपण परग्रहवासीयांशी संपर्क साधू शकू का, अशी शक्‍यता काही संशोधक पडताळून पाहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर परग्रहवासी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा घेतलेला हा एक आढावा.

विश्‍वात अनेक आकाशगंगा, ग्रह, तारे, धुळीचे ढग, क्वेसार्स, पल्सार्स, धुम्रमय नक्षत्रसमुह, ग्रह-ताऱ्यांची निर्मिती असणाऱ्या जागा, कृष्णविवरे आदी अनेक गोष्टी भरुन उरल्या आहेत. आपल्या पृथ्वीवर मानवी वस्ती आहे. तशीच मानवी वस्ती अन्यत्र ग्रहावर असू शकेल का, याचा शोध विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतला जात आहे. काहीजण म्हणतात, की परग्रहवासी अस्तित्वात नाहीत; तर काही म्हणतात आपण एक ना एक दिवस परग्रहवासीयांशी संपर्क साधू. परग्रहवासीयांनी पृथ्वीला यापूर्वीच भेट दिली असेल; पण मानवाने त्याकडे लक्ष दिले नसेल, असे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था "नासा' म्हणते.

"नासा'तील संगणक संशोधक सिल्व्हानो कोलंबानो म्हणतात, ""परग्रहवाशी असे असू शकतील. ते मानवासारखे दिसत असतील, अशा काही कल्पनेपेक्षा ही परग्रहवाशी वेगळे असू शकतील. ते अनेकदा पृथ्वीवर आलेले असतील. ते आपल्या कोणाशी संपर्क साधलेला नसेल किंवा साधला असला तरी तो समजला नसेल.'' परग्रहवासी जगात कुठेतरी दिसतात. पृथ्वीवर त्यांचे लक्ष आहे, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. संशोधक म्हणतात, समजा ते आले असतील तर पुरावा दाखवा; मात्र असे ठोस पुरावे आपल्याजवळ नाहीत. काही जण पुरावे दाखवतात. व्हिडीओ यु ट्यबूवर पाठवतात. काही ऐतिहासिक दस्तावेज दाखवतात. काही चित्रे, काही छायाचित्र दाखवतात. जरी असे पुरावे असले तरी अनेक देशांनी ते गुप्तपणे ठेवले ही असू शकतात, असा एक प्रवाह आहे. चंद्रावर जाणाऱ्या अपोला यानाचा पाठलाग परग्रहवासीयांनी केला होता, असेही यु ट्यबुमधील काही व्हिडीओमध्ये दिसते; मात्र खुद्द अमेरिकेने परग्रहवासी आहेत यावर शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा अन्य देशांनीही नाही. हॉलिवूडवाल्यांनी तर परग्रहवासीयांवर आधारित कितीतरी चित्रपट निर्माण केले आहेत.

या चित्रपटांनी तर जगभरात प्रचंड मोठा गल्ला कमावला आहे. असे चित्रपट पाहिले की, ते खरेच पृथ्वीवर आले असावेत, असे अनेकदा वाटून जाते. सिल्व्हानो म्हणतात, ""परग्रहवसीायांचे शरिर हे कार्बनवर आधारित असावे. विविध ताऱ्यांच्या माध्यमातून ते प्रवास करत पृथ्वीपर्यंत येत असावेत. त्यांच्याकडे अतिशय शक्तीशाली याने असतील. त्या यानात कोणते इंधन असेल? एक मात्र खरे की, ते अतिशय बुद्धिमान असावेत.'' हे सगळं आज तरी गृहितांवर आधारित आहे; पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, परग्रहवासीयांचा शोध अनेक माध्यमातून सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वी ते पृथ्वीवर येऊन गेल्याचे जगभरातील संस्कृतीमधील प्रतिमांवरुन दिसते; पण या प्रतिमांतून ते परग्रहवासीच आहेत का, हे मात्र सांगता येत नाही. "कालाचा संक्षिप्त इतिहास' या पुस्तकाची निर्मिती करणारे विख्यात शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग म्हणतात, ""ते जवळच आहेत. त्यांचे लक्ष आहे. ते कधीही पृथ्वीवर हल्ला करु शकतील.''

आतापर्यंत तरी त्यांनी आपल्यावर हल्ला केलेला नाही. समजा जरी ते असले तरी आपण त्यांच्याशी कोणत्या माध्यमातून संपर्क साधू शकतो, हे पाहणारे तंत्र आज आपल्याजवळ आहे. ते म्हणजे, आर्टिफिशियल इंटिलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता). कृत्रिम बुद्धिमत्तेने विज्ञान-तंत्रज्ञानावर अमिट ठसा उमटवायला सुरवात केली आहे. स्वत: कोलंबानो म्हणतो की, विश्वाचा शोध घेताना मानवी समाजाच्या स्वरूपाविषयी पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे. मानवी समाजात तंत्रज्ञानाचा विकास हा दहा हजार वर्षांपासून सुरू झाला. 500 वर्षांपासून वैज्ञानिक कार्यप्रणालीचा उदय झाला. अन आयडेंटीफाईड ऑब्जेक्‍टच्या (यूएफओ) घटना मानवाच्या लक्षात आलेल्या नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असावे; कारण परग्रहवासी पृथ्वीवर येण्याची शक्‍यता आपण फार कमी प्रमाणात गृहीत धरली आहे. ते जरी आले तरी ते आपल्याला चकवा देणार, असे वाटले असावे. त्यामुळेच आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आपण या घटनांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे,''

कोलंबो काय म्हणतो, हे तुमच्या लक्षात आले असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राद्वारे आपण त्यांचा शोध घेऊ. त्यांच्याशी संवाद साधू शकतो, असे संशोधकांना वाटते. सर्च फॉर एक्‍स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटिलिजन्स्‌ (सेती) हा प्रकल्प 1980 नंतर सुरु झाला. या प्रकल्पातून ही ठोस असे पुरावे मिळालेले नाहीत. जील टारटेर म्हणतो, ""रेडिओ ट्रान्समिशनच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकणार नाही.'' एक मात्र खरे की, या विश्‍वात फक्त पृथ्वीसदृश्‍य ग्रहांवरच मानवी वस्ती आहे. अन्यत्र ती असणे शक्‍य नाही, असे मनुष्याला वाटते. चिम्पाझीची सांस्कृतिक जडणघडण झाली आहे. चिम्पाझी हा अनेक साधने वापरतो. कोळी हा मोठे जाळे विणतो. कावळा हासुद्धा साधने वापरतो. मऊ लोकर असलेला जलस्थलवासी प्राणी (बीव्हर) हा एक उत्कृष्ठ अभियांता आहे. आपल्या निसर्गात असे काही प्राणी, पक्षी, किटक आहेत. जे मानवी बुद्धिमत्ता वापरुन बोलू शकत नाहीत. पण ते साधणांना वापर करु शकतात. तसेच परग्रहवसीा असू शकतील. ते कसेही दिसत असतील. ते मानवासारखेच दिसतील असे नाही. परग्रहवासी हे एखाद्या ऑक्‍टोपस, डॉल्फिन, एखादे मशिन किंवा मुलगामी प्रतिकृतीसारखी दिसतील. पृथ्वीवर जे काही आता आहे, त्याप्रमाणे ही दिसत असतील. प्रत्येकजण परग्रहवासी असे असतील, अशी कल्पना करत असतो; पण त्याहून अधिक वेगळेपण ही ते असू शकतील.

यासाठी खगोलशास्त्रज्ञ, चेतनापेशी विज्ञान संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञ, इतिहासकार आणि अन्य लोक एकत्र येऊन "डि-कोडिंग : एलियन इंटिलिजन्स' ही कार्यशाळा सिलिकॉन व्हॅलीतील सेती इन्स्टिट्युटमध्ये ऍस्ट्रो तंत्रज्ञ नथालिए कॅब्रोल यांनी आयोजित केली. 2016 पेपर्सचे वाचन झाले. या संशोधन पेपरमधून "सेती'चा रोडमॅप तयार केला गेला. जेणेकरुन येणाऱ्या काळात परग्रहवासीयांवर अभ्यास होईल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरले जाईल, हे नक्की.

संशोधन पेपरमध्ये कॅब्रोल म्हणते, "सर्च फॉर एक्‍स्ट्रा टेरेस्ट्रीयल इंटिलिजन्सच्या माध्यमातून आपण मागे ही पाहिले पाहिजे. आपल्या मानवी मेंदुच्या बाहेरसुद्धा आपण डोकावले पाहिजे. कल्पना केली पाहिजे, की परग्रहवासी कसे असतील?'' सिलीकॉन व्हॅलीमध्ये विघटनकारी विचार आणि सांस्कृतिक छेद देणारे विचार "सेती'च्या संशोधकांकडून ऐकायला मिळते. म्हणजे, "आऊट ऑफ वे' जाऊन एखाद्या प्रकल्पावर विचार करावा लागतो. अमेरिकी सरकारने तर "सेती' प्रकल्पाला अर्थसाह्य देणे 1990 पासून बंद केले आहे. तेव्हा सिलीकॉन व्हॅलीमधून येणाऱ्या कल्पना, तंत्रज्ञान आणि अर्थसाह्य वाढते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. उदाहारणार्थ, सेती इन्स्टिट्युटने ऍलन टेलिस्कोप ऍरेसाठी मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पॉल ऍलन यांनी 25 दशलक्ष अमेरिकी डॉलरची मदत दिली; तर 2015 मध्ये तंत्रज्ञ गुंतवणूकदार युरी मिल्नर यांनी दहा वर्षांसाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी ही दिला. यानंतर सेती इन्स्टिट्युट, इंटेल, आयबीएम आणि अन्य पार्टनर्स यांनी अंतराळ संशोधनातील समस्या सोडविण्यासाठी हाताळणी केली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करणारे संशोधकांनी फ्रंटियर डेव्हलपमेंट लॅब विकसित केली.

लायब्ररी ऑफ कॉंग्रेसच्या ऍस्ट्रो जीवशास्त्रज्ञ लुसियान वॅल्कोविझ यांनी 2017 मध्ये सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मार्ग आणि परमेश्‍वराविषयी काहीही समजणे शक्‍य नाही, अशी श्रद्धा असणारा एक वर्ग यांनी एकत्र येऊन चर्चा केली होती. एआय आधारित पद्धतीने वर्णन केले होते. ते म्हणतात, ""याचा अर्थ पूर्वनिर्धारित श्रेणीशिवाय कोणत्याही डेटाचा डेटा पाहण्याकरिता मशीन लर्निंगचा वापर करणे आणि त्याऐवजी त्या डेटा क्‍लस्टरला त्यांच्या नैसर्गिक श्रेणींमध्ये जाऊ देणे.'' यावरुन "सेती'तील संशोधक म्हणतात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे महत्वाचे असून मशिन लर्निंग तंत्रज्ञानमध्येही विविध कल्पनांचा उद्‌गम होत असतो. तुमच्याकडे कोणता डेटा उपलब्ध आहे. तो डेटा मशिन लर्निंगमध्ये टाकला की, योग्य ती माहिती मिळू शकेल.

परग्रहवासी आहेत की नाही, याबद्दल तुम्ही तुमच्या मेंदूबाह्य विचारप्रणाली अवलंबा. जेणेकरुन तुम्हाला ते आहेत की नाही, हे समजू शकेल. यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिकदृष्टीकोनाबाहेर विचार करावा लागेल. बाह्य अवकाशातून जे काही रेडिओ सिग्नल्स्‌ पृथ्वीवर येतात. ते सिग्नल्स्‌ सेती इन्स्टिट्युटमधील संशोधक वेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांना आशा आहे की, ते कधी तरी सापडतील. कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता सल्लागार ग्रॅहम मॅकीनतोश म्हणतात, ""परग्रहवासी जे काही सांगत आहेत. ते आमच्या डोक्‍याबाहेरचा विषय आहे. आपण त्याबाबत विचार ही करु शकत नाही. आताच्या तंत्रज्ञानावर आधारित आपण विचार करत असतो. परग्रहवासीयांना नेमके काय सांगायचे आहे, हे आपल्याला माहिती ही नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मात्र परग्रहवासीयांना काय सांगायचे आहे, ते सांगेल. ही एक अत्याधुनिक विचारप्रणाली असेल.''

मॅकीनतोश म्हणाले, ""आम्ही कदाचित स्वत:ला हुशार बनवू शकणार नाही; परंतु आम्ही आमच्यासाठी स्मार्ट बनविणारी मशीन्स बनवू शकतो.'' खगोल शास्त्रज्ञ मार्टीन रिझ म्हणाले, ""कृत्रिम बुद्धिमत्तेला कारणीभूत ठरू शकते. जे मानवांपेक्षा मागे पडते. जितके आपण बौद्धिकरित्या स्लीम मोल्डला (काचेचा साचा) मागे टाकतो.'' मुद्दा असा आहे की, विश्‍वाद्दलचं तुमचं ज्ञान किती आहे? हे ज्ञान मशिन लर्निंगला तुम्ही कसे फिड कराल. त्यावर परग्रहवासी आहेत की, नाही ते समजेल. त्यांच्याशी संवाध साधला जाईल. आतापर्यंत जितकी अवकाश याने सौर कक्षेच्या बाहेर अनंत प्रवासाला निघाली. त्या यानातून ही अजूनही कोणत्याही परग्रहवासीयांनी पृथ्वीशी विविध माध्यमातून संपर्क साधलेला नाही. जरी साधला असला तरी तितके प्रगत तंत्रज्ञान आजघडीला आपल्याकडे नाही. मुळात मुद्दा असा आहे की, परग्रहवासी असले तरी ते पृथ्वीशी कोणत्या भाषेत संपर्क साधतील. खरेतर हे अगम्य आहे. मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपण परग्रहवासीयांशी संपर्क साधू, असा आशावाद संशोधकांकडे दिसतो आहे. आपली कल्पना भविष्यकाळात कशी आकार घेईल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या कल्पनेला भविष्यकाळात कशी आकार देईल, यावर सगळे अवबलंबून आहे, असे संशोधक म्हणतात. काही म्हणा, आपल्याला पृथ्वीचा, विश्‍वाचा  कसून डेटा (माहिती) गोळा करावा लागेल. अनेक कल्पनांच्या शक्‍यता तुम्हाला आजमाव्या लागतील.

संशोधक एन्रिको फर्मीने एकदा प्रश्‍न विचारला की, "हे सगळे आहेत तरी कुठे?' म्हणजे, परग्रहवासी आहेत कुठे? खरेतर विश्‍वाचे वय पाहिले तर त्यातील ताऱ्यांची संख्या पाहता विश्‍वातत प्रचंड जीव असायला हवे होते. मात्र असे प्रगत वा अप्रगत परग्रहवासी असल्याचा आपल्याकडे पुरावा नाही. हा तो "फर्मीचा विरोधाभास'. आपल्या आकाशगंगेत दोन ते चार खर्व (एक खर्व = 100 अब्ज =100 बिलियन =10 रेज टू 11) तारे आहेत; तर विश्वातील ताऱ्यांची संख्या सात गुणिले 10 रेज टू 22 एवढी मानली जाते. फर्मीने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी खूप संशोधकांनी प्रयत्न केले.

आजसुद्धा हा प्रयत्न करणे सुरु आहे. नंतर अमेरिकन खगोलतज्ज्ञ फ्रॅंक ड्रेक एक समीकरण मांडले. ड्रेकचे समीकरण आकाशगंगेमध्ये प्रगत जीव किती असू शकतील, याचा अंदाज मांडते. हे समीकरण म्हणजे, N = ज्यांच्याशी संपर्क साधणे शक्‍य व्हावे अशा आपल्या आकाशगंगेतील परग्रहवासीयांची संख्या, R* = आपल्या आकाशगंगेतील तारे निर्मितीचा सरासरी दर, fp = आकाशगंगेतील ताऱ्यांशी, भोवती ग्रह फिरत असणाऱ्या ताऱ्यांचे गुणोत्तर (अपूर्णांकाच्या स्वरूपात, fraction), ne = अशा दर ताऱ्यामागे वस्ती योग्य ग्रहांची सरासरी संख्या, f = अशा ग्रहांशी प्रत्यक्षात जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction), fi = अशा वरील ग्रहांशी जिथे सजीवसृष्टी जगून, टिकून प्रगत समाज निर्माण झाले आहेत. अशा ग्रहांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction), fc = अशा एकूण परग्रहवासीयांची ज्यांच्या अस्तित्वाच्या खुणांचा माग काढता येऊ शकेल, अशा तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या परग्रहवासीयांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction), L = अशा वेध घेता येऊ शकणाऱ्या खुणा अवकाशात प्रक्षेपित करण्याचा परग्रहवासीयांचा कालावधी.

आता सर्व काही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित शोध घेतला जाईल. मशिन लर्निंग जितके आधुनिक होत जाईल, तितकी ही गणिते सोपी होत जातील. परग्रहवासी सापडतील की नाही, हे आजतरी सांगता येत नाही; पण भविष्यकाळात अशी आशा करायला काय हरकत आहे? जरी आपण संपर्क साधला तर आपल्या पृथ्वीला परग्रहवासीयांचा कोणता फायदा होईल? ही सर्व शक्‍यता आहे.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com