

MPSC Mains Exam Strategy
esakal
लेखक : महेश शिंदे
तर आता एकदाच ठरलं, ५ एप्रिलपासून एमपीएससीची पहिली वर्णनात्मक परीक्षा होणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अलीकडच्या काळात आपल्या परीक्षेच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विशेषतः मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक स्वरूपाची झाली आहे, जी संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसारखी आहे. या बदलामुळे उमेदवारांच्या तयारीच्या पद्धतीतही बदल करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मुख्य परीक्षा ही केवळ माहिती तपासणारी परीक्षा नसून ती समज, विश्लेषण क्षमता, तर्कशक्ती आणि स्पष्ट लिखाण कौशल्य तपासणारी परीक्षा आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की मुख्य परीक्षेची रणनीती पूर्णपणे वेगळी असते. या टप्प्यावर नियमित उत्तरलेखनाचा सराव, संकल्पनांची स्पष्टता आणि स्थिर विषयांसोबत चालू घडामोडी जोडण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते. पात्रता भाषा पेपर, सामान्य अध्ययन पेपर १ ते ४ आणि वैकल्पिक विषय या सर्वांसाठी योग्य रणनीती आखल्यास मुख्य परीक्षेत चांगले यश मिळू शकते.