
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)
mohinigarge2007@gmail.com
अरबी समुद्राच्या उग्र लाटांचा उसळलेला महाकल्लोळ... चोहीकडे पसरलेल्या अंधाराचं जीवघेणं रूप आणि सभोवती अनिश्चित असं घोंगावणारं युद्धवादळ! अशा भीषण परिस्थितीत आपल्या ‘आयएनएस खुकरी’ या युद्धनौकेवर हल्ला करण्यासाठी शत्रू सरसावला होता. जय-पराजयाच्या संकल्पनांच्या पलीकडे जात ९ डिसेंबर १९७१ च्या रात्री भारतीय नौदलाच्या एका योद्ध्याने, एका कर्णधाराने दिव्य इतिहास रचला.
पराक्रमाची, समर्पणाची आणि बलिदानाची उज्ज्वल परंपरा कायम राखत त्याने उधाणलेल्या समुद्रात विळखा घातलेल्या आक्रमक शत्रूला गर्जून सांगितलं, ‘‘इथे मृत्यूची तमा आहे कोणाला? काहीही झालं तरी मी, भारतीय कर्णधार,लढवय्या... युद्धाच्या भीषण वादळातही माझी नौका मी सोडणार नाही!’’