
दिवस होता ५ डिसेंबर १९६१ चा! झुडुपांमध्ये १६ गोरखा सैनिक सावधपणे वाट बघत होते. त्यांच्या हातातली ‘.३०३’ रायफल हाताळायला अत्यंत अवजड आणि कठीण होती. एक गोळी झाडली की, बोल्ट पुन्हा ओढायचा, काडतुसाचा खटाटोप करून पुन्हा पुढची गोळी झाडायची! त्यापेक्षा गोरखा लोकांचं पारंपरिक नेपाळी शस्त्रं ‘खुकरी’ बरंच गतिमान वाटत असे त्यांना! या सैनिकांनी आपापली खुकरी दातात पकडली होती. खुकरीचं धारदार पातं दुपारच्या उन्हात चकाकत होतं. या तळपत्या उन्हात, त्यांचा तितकाच तेजस्वी नेता कॅप्टन गुरबचन सलारिया धारदार आवाजात त्यांना हिंमत देऊ लागला.
तो म्हणाला, ‘‘सावध राहा... आपल्याला वादळासारखं तुटून पडायचं आहे शत्रूवर! जय महाकाली..!’’ त्यावर ‘‘अयो गोरखाली’’ असा बुलंद प्रतिसाद त्याला मिळाला. त्यांचं हृदय मृत्यूच्या भीतीच्या कितीतरी पुढे गेलं होतं, हे त्या घोषणेवरूनच कळत होतं! पण शत्रू कोण होता? पाकिस्तान? चीन? नाहीच! हे भारतीय सैन्य मुळी भारताच्या सीमेवर तैनात नव्हतंच! ते होतं मायभूमीपासून कितीतरी दूर... कुठलाही भूभाग नव्हे, तर जणू धोक्यात आलेल्या मानवतेला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपलं सैन्य तिथे गेलं होतं. अन्यायासाठी कुठेही लढणारा, योद्धा तो योद्धाच!