
दहावी-बारावीचे निकाल नुकतेच लागले असून विद्यार्थी सध्या ॲडमिशनच्या तयारीत आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य करिअरची निवड. करिअर अशी गोष्ट आहे, की एकदा घेतलेला निर्णय पुढे जाऊन बदलणे इतके सोपे नसते. त्यासाठी मुलांना दिशा दाखवण्याची मूलभूत जबाबदारी पालकांवर येते.
मुलांवर जबरदस्ती न करता त्यांच्या आवडीप्रमाणे करियर निवडायला पालकांनी मदत करणे आवश्यक असते. आता पूर्वीप्रमाणे परिस्थिती राहिलेली नाही, की हुशार विद्यार्थ्यांनी सायन्स निवडावे, मध्यम बुद्धिमत्ता असलेल्यांनी कॉमर्स निवडावे आणि कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांनी कला क्षेत्र निवडावे. आता हे चित्र बदलले आहे. आता विद्यार्थी आवड असलेल्या क्षेत्रामध्ये उच्चतम शिक्षण घेऊन आणि आपले कौशल्य वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.