

Santosh Kataria Entrepreneurial Journey
esakal
प्रसाद घारे - prasad.ghare@gmail.com
काष्टीसारख्या छोट्या गावातून पुण्यात आलेल्या संतोष कटारिया यांनी ३६५ चौरस फुटांच्या जागेत चार शिलाई मशीनपासून सुरू केलेला व्यवसाय आज देशभर पोहोचला आहे. एक ते चौदा वयोगटातील मुलींच्या कपड्यांसाठी ‘पेपरमिंट’ हा ब्रँड उभारत त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या उद्योजकतेला वेगळी ओळख मिळवून दिली. जिद्द, कल्पकता आणि धाडस यांच्या जोरावर उभ्या राहिलेल्या या ब्रँडची
मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरातच जन्माला यावे लागते, असे नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेल्या अनेक उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे उद्योग उभारले आहेत. लक्ष्मणराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद दोषी, भंवरलाल जैन, हणमंतराव गायकवाड अशी त्यातील काही ठळक नावे. या यादीत आता संतोष कटारिया यांचेही नाव घेता येईल. गेल्या ४२ वर्षांत (१९८४ ते २०२६) प्रामुख्याने एक ते चौदा या वयोगटातील मुलींसाठीच्या कपड्यांच्या क्षेत्रात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘पेपरमिंट’ या नावाचा अनोखा ब्रँड निर्माण करण्यात संतोष कटारिया यशस्वी झाले आहेत.
‘पेपरमिंट’चे खास मुलींसाठीचे कपडे मल्टी ब्रँड आऊटलेट, लार्ज फॉरमॅट स्टोअर, ई-कॉमर्स चॅनेल, स्वतःची वेबसाइट आणि एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेटच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले जातात. कंपनीची दोन खास दालने पुण्यातील एनआयबीएम रस्ता आणि सिंहगड रस्त्यावर नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आणि बारामतीच्या हायटेक टेक्स्टाइल पार्कमध्ये कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. पेपरमिंट (पूर्वीचे नाव क्रिस्टल) ब्रँडचे संस्थापक संतोष कटारिया यांनी १५ ऑगस्ट १९८४ रोजी पत्नी सुचिता कटारिया, बंधू राजेंद्र आणि कमलेश कटारिया यांच्या सहकार्याने या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. गेल्या काही वर्षांपासून कटारिया यांची अमेरिका आणि इटली येथून उच्च शिक्षण घेऊन आलेली दोन मुले आशिष आणि तेजस कंपनीत अनुक्रमे सीईओ आणि सीओओ म्हणून कामकाज पाहात आहेत.