
ChatGPT and creativity
esakal
आजकाल डिजिटल युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारलेली साधनं प्रत्येक जण वापरतोय. खास करून ‘चॅटजीपीटी’सारखी संवाद करणारी एआय साधनं आपल्याला लेखन, संवाद, संशोधन यासाठी आणि अगदी परीक्षेच्या तयारीसाठीही मदत करताहेत. पण यामुळे आपली स्वतःची विचार करण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती कमी होऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध एमआयटी मीडियालॅबमध्ये केलेल्या अभ्यासानं काही गंभीर गोष्टी पुढे आलेल्या आहेत.
एमआयटीच्या संशोधकांनी ५४ लोकांवर एक प्रयोग केला. त्यांना SAT परीक्षेत (undergraduate admissions test) येणारे निबंध लिहायचे होते. या लोकांचे तीन गट बनवले. एक गट स्वतःची कल्पनाशक्ती वापरून निबंध लिहित होता. दुसऱ्या गटाला गूगल सर्च वापरायला परवानगी होती, तर तिसऱ्या गटाकडे चॅटजीपीटी वापरण्याची मुभा होती. हे चालू असताना या सगळ्यांचा मेंदू ईईजी (इलेक्ट्रोएन्सिफलोग्राम) तंत्रज्ञानानं तपासला गेला. परिणाम आश्चर्यकारक होते – चॅटजीपीटी वापरणाऱ्यांचा मेंदू निबंध लिहिताना कमी सक्रिय असल्याचं दिसलं. त्यांच्या निबंधांमध्ये सर्जनशीलता कमी होती आणि वेगळे किंवा ओरिजिन विचार फारसे नव्हते. काहींनी सुरुवातीला स्वतःचे विचार वापरले, पण शेवटी थेट चॅटजीपीटीकडून मिळालेला मजकूर कॉपी-पेस्ट करायला सुरुवात केली.