

Vellore Fort Maratha Empire History
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला व स्वराज्याचा अविभाज्य घटक असणारा तमिळनाडूतील वेल्लोर किल्ला प्रदीर्घ काळ विजयनगर साम्राज्याचा आधारस्तंभ होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याने सुमारे १४ महिने वेल्लोरला वेढा टाकला होता. सुमारे ३० वर्षे मराठ्यांनी वेल्लोर किल्ल्यावर राज्य केले. राजपरिवाराच्या संरक्षणासाठी वेल्लोर गडाचे मोलाचे सहाय्य लाभलेले आहे.
वेल्लोर किल्ला इ.स. १२७४ मध्ये भद्राचलचा राजा बोम्मा रेड्डी याने बांधलेला आहे. १५६६ मध्ये या किल्ल्याचे विजयनगर सम्राटांच्या अंकित असणाऱ्या चिन्ना बोम्मी यांनी मजबुतीकरण केले. हा किल्ला पूर्णतः ग्रॅनाईटच्या चिरेबंदी दगडात बांधलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. हिंदवी स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडील कर्नाटक, गोवा आणि तमिळनाडूपर्यंत आहे. दक्षिण भारत जिंकून उत्तर भारतावर अंमल करायचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. दक्षिण भारत जिंकून स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी ६ ऑक्टोबर १६७६ रोजी (विजयादशमी) रायगडावरून प्रस्थान केले आणि तळकोकण, पाटगाव, अजिंक्यतारा, आटपाडी, सांगोला, गोवळकोंडा, श्रीशैलम, तिरुपती, वेल्लोर अन् जिंजीला आले. त्यांनी मे १६७७ मध्ये तमिळनाडूतील वेल्लोर किल्ल्याला वेढा टाकला. जिंजीलादेखील वेढा टाकला. १३ मे १६७७ रोजी त्यांनी जिंजी किल्ला जिंकला.