

Chhatrapati Shivaji Maharaj Military Campaigns
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
फोंडा जिंकणे अवघड जात असल्याचे पाहून, राजांनी स्वतः युद्धात झेप घेऊन १ मे १६७५ रोजी फोंड्यावर भगवा फडकवला. या नेत्रदीपक विजयानंतर अंकोल्यापर्यंतचा प्रांत स्वराज्यात दाखल करून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. विजापूर दरबारातील यादवीचा अचूक फायदा घेत थेट औरंगाबाद व अथणीपर्यंत धडक मारून शत्रूची दाणादाण उडवली. जव्हार-रामनगरचे बंड मोडत, नेतोजी पालकरांचे शुद्धीकरण केले आणि मुघलांशी धोरणी तह करून स्वराज्याची विजयी घोडदौड अशीच अविरत सुरू ठेवली.
पोर्तुगीजांच्या गोवा प्रांताच्या सीमेवर वसलेला आणि आदिलशाहीच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ला जिंकणे स्वराज्याच्या दृष्टीने आवश्यक होते. यासाठी राजांनी अण्णाजी पंडित यांना ३ हजार घोडेस्वारांसह रवाना केले. अण्णाजींनी ६-७ फेब्रुवारी १६७५ रोजी राजापूर येथून निघून फोंड्यावर हल्ला चढवला. मात्र फोंड्याचा आदिलशाही किल्लेदार मुहम्मद खान हा अतिशय दक्ष व शूर असल्याने त्याने तो हल्ला परतवून लावला.
राजे स्वतः युद्धमोहिमेवर ः फोंड्याच्या पराभवाची बातमी मिळताच राजांनी स्वतः या मोहिमेची सूत्रे हाती घेतली. तब्बल १५ हजार घोडदळ, १४ हजार पायदळ, १० हजार मजूर व सर्व युद्धसाहित्यांसह राजे रायगडाहून ६ मार्च १६७५ रोजी फोंड्याच्या दिशेने निघाले. ते २२ मार्च रोजी विलावडे, २४ मार्च रोजी राजापूर व २ एप्रिल रोजी कुडाळ येथे पोहोचले. आपल्या मागावर शत्रूने येऊ नये म्हणून तसेच आदिलशाह व पोर्तुगीजांकडून फोंड्याला कोणतीही मदत मिळू नये, यासाठी त्यांनी ठिकठिकाणी सैन्य ठेवले. आणि ४ एप्रिल रोजी २ हजार घोडदळ व ७ हजार पायदळासह फोंडा किल्ल्याला कडक वेढा घातला.
किल्लेदार मुहम्मद खान अतिशय कडवी झुंज देत होता. वेढा घातल्यानंतर शिवसैन्याने किमान ४ वेळा सुरुंग लावून तटबंदी पाडण्याचा निकराचा प्रयत्न केला. अनेकवेळा किल्ल्यावर थेट हल्ला देखील चढविण्यात आला. मात्र किल्लेदाराने प्रत्येकवेळी हल्ले परतवून लावले. यानंतर राजांनी डावपेच बदलले आणि आदिलशाही सैन्यावर दबाव येऊन त्यांचे सैन्य विखुरले जावे यासाठी आपल्या सैन्याला इतरत्र हल्ले करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसैन्याने एटगेरी (यादगीर), भागानगर जवळची २ शहरे, कारवार तसेच पोर्तुगीज प्रदेशातील कुंकळ्ळी (कुकुली), वेरुडे, चांदोर (चंदर) या ठिकाणांवर हल्ले केले.
अखेर १ मे १६७५ रोजी मोठा सुरुंग लावून किल्याची भिंत उडवून देण्यात शिवसैन्याला यश आले आणि फोंडा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. फोंडा किल्याच्या दुरुस्तीची जबाबदारी अणाजी पंडित यांच्यावर सोपवून राजे अंकोला येथे पुढील मोहिमेसाठी मार्गस्थ झाले.