

Pattagad Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीत जसे मावळ्यांचे महत्त्व आहे, तसेच भौगोलिक स्थळांचेही मोलाचे योगदान आहे. सह्याद्री पर्वतावरील डोंगररांगा आणि गडकोटांनी स्वराज्याला मोलाची साथ दिली. त्यांपैकी महत्त्वाचा गड आहे, पट्टागड तथा विश्रामगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात विश्रामगडाचे महत्त्वाचे स्थान आहे. शेवटची लढाई करून शिवाजी महाराज विश्रामगडावर पोहोचले. अशा या गडाला ऐतिहासिक वारसा आहे. पट्टागडावर असणाऱ्या गुहा त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. या गडावर कोळी समाजाचे अधिपत्य होते. नंतर हा गड बहमणी राज्याकडे आला. बहमणी सत्तेच्या पतनानंतर निजामशहाने या गडावर ताबा मिळविला. १६२७ मध्ये हा गड मोगलांनी जिंकला. बहमणी, निजाम आणि मोगल यांनी पट्टागडाच्या माध्यमातून स्थानिक प्रजेचे शोषण केले. त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले.
मोगल, आदिलशहाच्या गुलामगिरीतून प्रजेला कायमचे मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी अनेक अजिंक्य आणि दुर्गम गडकोट जिंकून घेतले. १६७१ मध्ये महाराजांनी पट्टागड जिंकून घेतला. पट्टागड हा आजच्या नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्री पर्वतावर आहे. गडाचे स्थान अकोले तालुक्यात असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४५०० फूट आहे. पट्टागड गिरीदुर्ग प्रकारचा असून निसर्गाच्या कुशीत वसलेला नयनरम्य असा आहे. त्याचा आकार पट्ट्यासारखा असल्याने त्याला ‘पट्टागड’ असे म्हटले जाते.