

Vasai Fort
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक असणारा पालघर जिल्ह्यातील जलदुर्ग तथा मिश्रदुर्ग म्हणजे वसई दुर्ग... तो सुमारे ११० एकरावर उभा आहे. तो सिंधुसागराच्या किनाऱ्यावर असून त्याच्या दोन्ही बाजूंनी समुद्र, एका बाजूने दलदल; तर दुसऱ्या बाजूने भूभाग आहे. सुरुवातीला या गडाला चार बुरूज होते. वसई दुर्ग तेथील स्थानिक भोगळ राजे यांनी १३९४ ते १४१४ मध्ये बांधला. त्यांनी न्यायाने राज्य केले. वसई दुर्ग ही भोगळ राजाची राजधानी होती. १५२६ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूरशहाने वसई गडावर हल्ला केला. भोगळ राजा आणि बहादूरशहा यांच्यामध्ये लढाई झाली. अखेर बहादूरशहाने भोगळ राजाची हत्या केली. बहादूरशहाने वसई दुर्गावर ताबा मिळविला. वसई गड हा सिंधुसागराच्या उत्तरेकडील विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातच्या सामुद्रिक सीमेवरील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. उत्तर भारतात सत्तेचा विस्तार करायचा असेल, तर वसई किल्ला जिंकणे महत्त्वाचे आहे, हे पोर्तुगीजांनी ओळखले. त्यांनी १५३४ मध्ये वसई गडावर हल्ला केला आणि २३ डिसेंबर १५३४ रोजी तो ताब्यात घेतला.