

Himalayan Glacier Climate Change
esakal
हिमालय हा स्थिर नाही. तो सतत घडत आहे, बदलत आहे आणि आपल्याला त्या बदलांची जाणीव करून देत आहे. चोराबरी हिमनदी त्या बदलांचा एक जिवंत पुरावा आहे, शांत दिसणारा, पण आतून सतत हलणारा. चोराबरी हिमनदीचा अभ्यास करताना वैज्ञानिकांनी एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे हिमालयातील हिमनद्या अत्यंत संवेदनशील आहेत. हवामानातील लहान बदलही त्यांच्यावर मोठा परिणाम करू शकतात.
हिमालयातील हिमनद्या केवळ बर्फाचे साठे नसतात; त्या नद्यांना जन्म देतात, संस्कृती घडवतात आणि कधी कधी आपल्या मर्यादांची जाणीव करून देतात. पिंडारीसारखी हिमनदी आपल्याला हिमालयाशी ओळख करून देते, तर केदारनाथ परिसरातील चोराबरी हिमनदी आपल्याला हिमालयाचा दुसरा, अधिक गंभीर आणि संवेदनशील पैलू दाखवते.
उत्तराखंडमधील केदारनाथाच्या वरच्या भागात वसलेली चोराबरी हिमनदी आकाराने मोठी नसली तरी तिचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. ही हिमनदी मंदाकिनी नदीच्या उगमाशी संबंधित आहे. हिमनदीच्या जवळच चोराबरी तलाव, ज्याला गांधी सरोवर म्हणूनही ओळखलं जातं, वसलेला आहे. या संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता आहे, पण ही शांतता नेहमी स्थिर नसते.
केदारनाथ केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर ते एक जिवंत हिमालयीन प्रयोगशाळा आहे. येथे उभं राहिलं की हिमनदी, नदी, पर्वत आणि हवामान यांचा एकत्रित परिणाम स्पष्टपणे दिसतो. चोराबरी हिमनदी ही त्या प्रणालीचा एक केंद्रबिंदू आहे.
हिमनदीच्या निर्मितीची प्रक्रिया येथेही तशीच आहे. उंच भागात साठणारा हिम, त्यावरचा दाब आणि गुरुत्वाकर्षणामुळे खाली सरकणारा बर्फ. पण चोराबरी हिमनदीचं वैशिष्ट्य तिच्या आकारात नसून तिच्या स्थानात आहे. ती एका अत्यंत संवेदनशील, उंच आणि जलद बदलणाऱ्या प्रदेशात आहे.